चोरीतील जप्त केलेले ५ लाखांचे टायर गेले चोरीला

उंब्रज पोलिस स्टेशनचा कारभार चव्हाट्यावर; दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
चोरीतील जप्त केलेले 5 लाखांचे टायर गेले चोरीला

उंब्रज – चोरीच्या घटनेत जप्त केलेले सुमारे 5 लाखाचे टायर उंब्रज पोलिसांच्या ताब्यातून चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना दहा महिन्यांपूर्वी घडली होती. यावेळी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. परंतु पोलीस ठाण्यातून चोरीस गेलेले लाखो रुपये किंमतीच्या टायर चोरीच्या प्रकरणामुळे उंब्रज पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. सनी आबा बैले (वय 29) रा. उंब्रज व बरकत खुद्दबुदीन पटेल (वय 30) रा. वहागाव असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

-Ads-

याप्रकरणी दोन संशयितांना कराड न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेबाबत उंब्रज पोलिसांनीच दिलेली माहिती अशी, दि. 9 ऑक्‍टोंबर 2018 रोजी उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जोतीराम भुजबळ यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 19 मे 2018 रोजी मुद्देमाल कारकून असलेल्या फिर्यादी जोतिराम भुजबळ यांना पोलीस ठाण्यातील स्वीपर राजेंद्र कोळी यांचा फोन आला की, पोलिसांच्या शासकीय निवासस्थान रुममध्ये ठेवण्यात आलेल्या जप्त मुद्देमालामधील टायर्स गायब असून खोलीही उघडी आहे.

यानंतर जोतिराम भुजबळ यांनी माहिती घेतल्यानंतर त्यांना खोलीमध्ये 2000 सालच्या चोरीच्या गुन्ह्यातील जप्त केलेले टायर गायब झाले असल्याचे निदर्शनास आले. यावेळी या प्रकरणातील घटनेची फिर्याद नोंद करण्यात आली. तत्कालीन किंमतीनुसार 4 लाख 94 हजार रुपयांचे 61 टायर अज्ञात चोरट्यांनी शासकीय निवासस्थानातील रुमचे कुलूप तोडून चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

यानंतर या फिर्यादीवरुन संबधित पोलीस अधिकारी यांनी तपास सुरु केला होता. परंतु ही बाब आज अखेर गोपनीयच ठेवण्यात आली होती. नुकतेच उंब्रज पोलीस ठाण्याचा कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी घेतला आहे. त्यांच्या बरोबर उंब्रज बिटचा कार्यभार पोलीस उपनिरीक्षक ज्योस्ना भांविस्टे यांनी घेतला आहे. काही दिवसात या अधिकाऱ्यांनी या चोरीप्रकरणाचा छडा लावला. या चोरी प्रकरणी उंब्रज पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.

कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार

गेली 8 ते 9 वर्षापासून चोरीप्रकरणात जप्त केलेले उंब्रज पोलिसांच्या ताब्यात असलेले लाखो रुपयांचे टायर चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना पाच महिन्यापूर्वी घडलेली असतानाही याबाबत केवल फिर्याद दाखल करीत पोलीसांनी तेरी भी चुप, मेरी भी चुप ची भूमिका घेतली. मात्र याप्रकरणातील दोन संशयितांना अटक केल्यानंतर हा प्रकार उघड्यावर आला. यामुळे कुंपनानेच शेत खाल्ले की काय ? यावर नागरिकांमधून जोरदार चर्चा सुरु आहे.

टायर चोरी प्रकरणाची फिर्याद यापूर्वीच उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. घडलेला प्रकार खात्याच्या दृष्टीने योग्य नाही. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या मूळाशी जावून तपास करणार असून संबंधितांना लवकरच अटक करु. -ज्योत्स्ना भांविस्टे, पोलीस उपनिरीक्षक, उंब्रज.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)