475 नागरिकांना घरबसल्या ‘आधार’

जिल्हा प्रशासनाचा पुढाकार 


वृद्ध, दिव्यांगाना लाभ

पुणे – वयोवृध्द नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांना आधार नोंदणी केंद्रात जाता येत नसल्याने अशा व्यक्ती आधार नोंदणीपासून वंचित आहेत. या नागरिकांची आधार नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. या नागरिकांची आधार नोंदणीसाठी घरपोच सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत शहरातील 475 नागरिकांची आधार नोंदणी घरबसल्या केल्याची माहिती तहसीलदार विकास भालेराव यांनी दिली.

आधार कार्ड आता सर्वच योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्‍यक आहे. जिल्ह्यातील सुमारे 95 टक्के नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे. मात्र वयोवृध्द नागरिक, अपंग व्यक्ती यांना घराबाहेर पडता येत नसल्याने अशा नागरिकांची आधार नोंदणी झालेली नाही. या व्यक्तींना आधार केंद्रांपर्यंत घेऊनही जाता येत नाही. या नागरिकांचे आधार कार्ड नसल्याने त्यांना विविध योजनांचा लाभ घेता येत नाही. बॅंक खाते, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक यांच्याशी आधार लिंक करता येत नाही. घरपोच आधार नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत एकूण 590 नागरिकांनी अर्ज केले. त्यातील 475 नागरिकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे.
चौकट

असा करा अर्ज
घरपोच आधार नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात टपाल शाखेमध्ये अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये ज्या नागरिकाचे आधार नोंदणी करावयाची आहे त्यांचे नाव, पत्ता, वय, मोबाइल क्रमांक आदी माहितीसोबतच घरपोच नोंदणीसाठीचे कारणही यामध्ये नमूद करणे आवश्‍यक आहे. अर्जदाराला अर्ज करता येत नसेल तर त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने अर्ज केला तरी चालणार आहे. अर्जाची खातरजमा करून तो अर्ज संबधित आधार केंद्रांकडे जमा देण्यात येईल. त्यानंतर संबधित अर्जदाराशी आधार केंद्र चालक संपर्क साधून आठ ते दहा दिवसांत या नागरिकांची आधार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)