लाखों भाविकांचे कुलदैवत …

म्हसवडचा सिद्धनाथ हे महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यांतील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यातील माणगंगेच्या तीरावर म्हसवड येथे श्री सिद्धनाथांचे दहाव्या शतकातील हेमाडपंथी, भव्य दगडी मंदिर आहे. मंदिरातील भुयारात काशी-विश्‍वेश्‍वराची स्वयंभू शिवपिंड आहे. शिवाचे रक्षक म्हणून श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरी हे स्थान मानले जाते. श्री सिद्धनाथ, भैरवनाथ, सिद्धेश्‍वर, कालभैरव, महाकाळ, शिदोबा आदी नावानेही देवाचा उल्लेख केला जातो.

श्रीधर स्वामींच्या “काशिखंड’ या ग्रंथामध्ये काळभैरवाची उत्पत्ती कशी झाली? त्यासंबंधीचा उल्लेख आढळतो. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण? असा वाद एकदा त्रैलोक्‍यात निर्माण झाला. त्यावेळी गायत्री म्हणाली, शिवस्वरूप ब्रह्म अगम्य आहे. शिवाच्या अधीन सर्व काही असते, त्यामुळे सर्वश्रेष्ठ एक शिवच आहे. हे ऐकून ब्रह्मा व विष्णू यांना राग आला व त्यांनी गायत्री आणि शिवाचा निषेध केला. हा निषेध ऐकून शिवशंकरांना क्रोध अनावर झाला व त्यांनी आपला उजवा हात क्रोधाने झटकला. त्यावेळी शिवाच्या उजव्या भूजदंडापासून महाकाळ म्हणजेच काळभैरवांची उत्पत्ती झाली. त्यावेळी शिवश्रेष्ठत्वाची सर्वांना प्रचिती आली. लिंगरुपाने शिव भुयारात स्थित झाले व रक्षणकर्ते शिवअवतार स्वरूप म्हणून कालभैरव व जोगेश्‍वरी गाभाऱ्यातील सिंहासनावर आरुढ झाले, अशी अख्यायिका आहे.

भुयारातील शिवलिंग वर्षातून
एकवेळ म्हणजे फक्त महाशिवरात्रीच्या रात्री भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर खुले असते. तेवढी रात्र संपल्यावर भुयार वर्षभर बंद असते. या बंद भुयाराच्या प्रवेशद्वाराजवळ एक छोटासा पलंग ठेवलेला असून, त्यावरील गाद्यांवर श्री सिद्धनाथ व जोगेश्‍वरी यांच्या पंचधातूच्या उत्सव मूर्ती कायम वर्षभर ठेवलेल्या असतात.

भुयारातील स्वयंभू शिवपिंडीच्या बरोबर मध्यावर असणाऱ्या गाभाजयातील सिंहासनावर श्री सिद्धनाथ व जागेश्‍वरी देवी यांच्या गंडकी शिलेवर कोरलेल्या व अप्रतिम कोरीव काम केलेल्या रेखीव मूर्ती उभ्या आहेत. बाहेरील भागात अनेक देव-देवतांच्या मूर्ती आहेत. बाहेर उजव्या बाजूस एक मोठे व वेगळे शिवलिंग आहे. त्याच्या शेजारी असलेल्या नंदीजवळील भिंतीवर कन्नड भाषेत कोरलेला एक शिलालेख आहे. शिलालेखाची वरच्या भागाची रुंदी 49 सेंटीमीटर व खालील भागाची रुंदी 65 सेंटीमीटर आणि लांबी 110 सेंटीमीटर आहे.

एवढ्या भागात एकूण 43 ओळी आहेत. याची लिपी मध्यमयुगीन कन्नड आहे. प्रारंभीचा मंगलश्‍लोक आणि शेवटचा आशीवार्दात्मक श्‍लोक हे संस्कृतमध्ये आहेत. उर्वरित सर्व मजकूर कन्नड भाषेत आहे. या शिलालेखाचे मराठी भाषांतर सोलापूरचे आनंद कुंभार यांनी शासनाच्या संशोधन तरंग या मासिकात केले आहे. त्यावरून हा शिलालेख इ. स. 1148 साली कल्याण चालुक्‍य चक्रवर्ती जगदेकमल्ल (दुसरा) या राजाच्या कारकिदीर्तील कारागिरांनी कोरलेला आहे हे स्पष्ट होते. या राजाने म्हसवड येथील जमीन सिद्धेश्‍वर देवास दान दिली, असा उल्लेख या शिलालेखात आढळतो.

श्री सिद्धनाथ मंदिरात परंपरेनुसार कार्तिक शुद्ध एक (दिवाळी पाडवा) या दिवशी पहाटे गाभाजयाजवळ असणाऱ्या देवापुढे मंदिराचे मुख्य पुजारी, सालकरी यांच्या हस्ते मानकरी व सेवेकरी यांच्या उपस्थितीत घटस्थापना केली जाते. म्हसवड गावात व इतरत्र श्री नाथांना कुलस्वामी मानणारे भक्त आपापल्या घरी घटस्थापना करतात. हे घट बारा दिवसांचे असतात. सर्व पुजारी व भाविक या काळात बारा दिवस उपवास करून श्रींची भक्ती करतात, याला नवरात्र म्हणतात. देवीचे नवरात्र नऊ दिवसांची असते. मात्र, श्री सिद्धनाथांचे हे नवरात्र 12 दिवसांचे असते. घटस्थापनेपासून नवरात्रारंभ होतो. याच दिवशी दुपारी 12 वाजता श्रींचा हळदी-समारंभ होतो. श्री सिद्धनाथ-जोगेश्‍वरी यांच्या पंचधातूच्या उत्सवमूर्तींना हळदी लावण्याच्या कार्यक्रमात येथील गुरव समाज, गावातील तसेच परगावच्या हजारो महिला सहभागी होतात. ढोल, सनई-चौघडा, बॅंड यांच्या मंगल गजरात हा हळदी समारंभ होतो.

घट बसलेल्या दिवसांपासून बारा दिवस उपवास करून येथील गुरव समाज, शहरातील महिला-पुरुष, आबालवृद्ध पहाटे चार वाजल्यापासून कार्तिक स्नान करून माणगंगेच्या पात्रातून संपूर्ण नगरप्रदक्षिणा घालतात. मंदिरात काही पुजारी व भक्तगण बारा दिवस अहोरात्र उभे राहून श्रींची उपासना करतात. याला उभे नवरात्र म्हणतात. ही परंपरा अव्याहत, अखंडपणे सुरू आहे.

कार्तिक शुद्ध 12 (बारस-तुलसी विवाह) रोजी रात्री 11.30 वाजता मंदिराच्या बाहेरील हत्ती मंडपातील सुशोभीत केलेल्या हत्तीवरील अंबारीत बसवण्यात आलेली श्रींची मूर्ती विवाहासाठी मंदिराचे मुख्य पुजारी गाभाऱ्यात नेतात. गाभाजयात जोगेश्‍वरी देवीच्या मूर्तीसमोर अंतरपाट धरून मंगलाष्टकांसह पारंपारिक, धार्मिक, विधिपूर्वक, शास्त्रोक्त पद्धतीने रात्री 12 वाजता मोठ्या थाटाने श्री सिद्धनाथ जोगेश्‍वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होतो.

बाहेरील हत्ती मंडपातून श्री सिद्धनाथांची मूर्ती गाभाऱ्यात नेत असताना हजारो भाविक-भक्तिभावाने मूर्तीस स्पर्श करण्यास धडपडत असतात, कारण श्रींच्या मूर्तीस स्पर्श झाल्यावर संपूर्ण वर्ष सुख-समृद्धीचे व भरभराटीचे जाते अशी श्रद्धा आहे. श्रींची मूर्ती गाभाऱ्यात नेल्यानंतर पुरोहितांमार्फत धार्मिक विधीनुसार श्रींचा विवाह सोहळा संपन्न होतो.

या सिद्धनाथ मंदिरातील मुख्य पुजारी-सालकरी असतात. ते वर्षभर संन्यस्त राहून सकाळ-संध्याकाळ शुचिर्भूत होऊन श्रींना पंचामृत व गरम उदकाने स्नान, दररोज विविध अवतारातील पूजा, पहाटे पाच वाजता काकड आरती, सकाळी साडेआठ वाजता मुख्य आरती, दुपारी तीन वाजता धुपारती, रात्री साडेआठ वाजता मुख्य आरती व रात्री दहा वाजता शेजारती अशी दिवसातून पाच वेळा श्रींची आरती अखंडपणे करतात.

महाराष्ट्रातील आराध्य दैवतापैकी म्हसवड सिध्दनाथ हे दैवत असुन राज्यासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश राज्यातील असंख्य भाविकाचे कुलदैवत आहे. जागृत देवस्थान म्हणुन श्री सिध्दनाथाची ख्याती सर्वदुर पसरली आहे. माणगंगेच्या तीरावर इ. स. 10 व्या शतकातील श्री सिध्दनाथाचे हेमाडपंथी भव्य मंदिर आहे मंदिरातील भुयारात काशी विश्‍वेश्‍वराची स्वयंभु पिंड आहे. शिवाचे रक्षक म्हणुन श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरीचे स्थान मानले जाते श्री सिध्दनाथाचे भैरवनाथ, सिध्देश्‍वर, काळभैरव, महाकाल, भाग्यादेव, सिदोबा या नावानी संबोधले जाते.

काळभैरवाची मुळ कथा
श्रीधर स्वामींच्या काशीखंड या ग्रंथामध्ये काळभैरवांची उत्पत्ती कशी झाली या संबधिचा पुढील उल्लेख आढळतो.ब्रम्हा आणि विष्णु यांच्या मध्ये श्रेष्ठ कोण असा वाद निर्माण झाला त्यावेळी गायत्री म्हणाली शिवस्वरूप ब्रम्ह अगम्य आहे शिवाच्या अधिन सर्वकाही असते त्यामुळे शिवच सर्व श्रेष्ठ आहे हे ऐकुन ब्रम्हा व विष्णु यांना राग आला त्यानी गायत्री व शिवाचा निषेध केला हा निषेध ऐकुन शिवांना क्रोध अनावर झाला त्यांनी क्रोधाने त्यांनी आपला डावा हात झटकला त्यावेळी शिवाच्या उजव्या भूदंडापासुन महाकाल म्हणजेच कालभैरवाची उत्पत्ती झाली तेव्हा शिवश्रेष्टत्वाची सर्वांना प्रचिती आली लिंग रूपाने शिव भुयारात स्थित झाले.

रक्षणकर्ते व शिवअवतार स्वरूप म्हणुन काळभैरव व जोगेश्‍वरी माता गाभा-यात सिंहासनारूढ झाले अशी आख्यायिका आहे म्हसवडच्या मंदिरात असणारे भुयारातील शिवलिंग वर्षातुन एकवेळ म्हणजे फक्त महाशिवरात्रीच्या रात्री भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर खुले केले जाते त्या रात्री नंतर भुयार बंद केले जाते या बंद भुयाराच्या प्रवेशद्वारावर एक छोटासा पलंग ठेवलेला असुन त्यावरील गाद्यांवर श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरीच्या उत्सव मुर्ती ठेवलेल्या असतात.

मंदिरातील मुर्तीस्थान व शिलालेख
मंदिरात असणाऱ्या भुयारातील स्वयंभु शिवपिंडाच्या बरोबर माथ्यावर असणाऱ्या गाभाऱ्यातील आकर्षक सिंहासनावर श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरी यांच्या गंडकी शिलेवर कोरलेल्या अप्रतिम रेखीव मुर्ती आहेत गाभाऱ्यातील बाहेरील भागात अनेक देवदेवतांच्या मुर्ती आहेत. उजव्या बाजुस एक मोठे व वेगळे शिवलिंग आहे त्याच्या शेजारी भिंतीवर कन्नड भाषेत कोरलेला एक शिलालेख आहे हा शिलालेख कल्याण चालुक्‍य जयदेव मल्ल यांच्या काळातील कारागिरांनी कोरलेला आहे.आज म्हसवडची रथयात्रा

आज शनिवार मार्गशिर्ष शुध्द एकादशी दिवशी श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरीची लग्नाची वरात म्हणजे रथयात्रा होत आहे मजबुत चंदनाच्या लाकडी रथामध्ये 12 वाजता श्रीच्या उत्सव मुर्ती बसविल्या जातात रथाला जाडजुड दोर बांधुन हा रथ ओढला जातो.माणगंगा नदिच्या पात्रातुन शहराला उजवी प्रदक्षिणा घालुन रात्री 12 नंतर हि रथयात्रा मुळस्थानावर येते यावेळी भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर गुलाल खोब-याची उधळण केली जाते. सिध्दनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषाने म्हसवड नगरी दुमदुमुन जाते भाविक नोटांच्या नारळांची तोरणे अर्पण करतात दरवर्षी यात्रेसाठी 4 ते 5 लाख भाविक उपस्थिती लावतात.

सालकरी यांना भाविक पूज्य मानतात. हे वर्षभराचे अत्यंत कडक व कठीण असे व्रत आहे. साल करणऱ्यांना अतिशय कडक व कठीण नियमांचे तंतोतंत पालन करावे लागते. साल करणाऱ्यांचा विवाह होणे आवश्‍यक असते. अविवाहितास साल करता येत नाही. साल हे वैशाख शुद्ध पौर्णिमेस दरवर्षी बदलत असते. एकदा साल सुरू झाले की साल करणाऱ्यांना या काळात ब्रह्मचर्य पाळावे लागते. सकाळ-संध्याकाळ सुचिर्भूत होऊन देवाचे स्नान घालणे, पूजा बांधणे, आरती करणे हा सर्व धार्मिक विधी सालकजयांना वर्षभर अखंडपणे, नियमितपणे व अगदी ठरलेल्या वेळेवरच करावा लागतो.

सालकरणऱ्यांना वर्षभर पांढरे धोतर, पांढरी बाराबंदी, पांढरा फेटा व खांद्यावर उपरणे याच पेहेरावात राहायचे असते. वर्षभर पायात चप्पल घालायची नसते. त्या ऐवजी लाकडी खडावा वापरावयाच्या असतात. वर्षभर कितीही महत्त्वाचे अगदी कोर्टाचे काम असले तरी गावाची वेस ओलांडून जायचे नसते. वर्षभर केस कापायचे नाहीत. दाढी करायची नाही आणि विशेष म्हणजे कोणालाही नमस्कार करावयाचा नसतो. कारण सालकरी म्हणजे देवअवतार मानले जातात.

वर्षभर सकाळी व रात्री मुख्य आरती झाल्यानंतर सालकऱ्यांच्या घरचा नैवेद्य श्रींना त्यांच्याच हस्ते दाखवला जातो. वर्षभर मंदिरातच वास्तव्य करावयाचे असते. घर, संसार, प्रपंच, मुले-बाळे हे काहीही सालकऱ्यांनी पाहावयाचे नसते. अशा प्रकारे अत्यंत कडक व कठीण नियमांचे पालन करून श्रींची सेवा करावयाचे हे एक कडक वृत्त आहे. येथील गुरव व भाविकांनी श्री सिद्धनाथ मंदिराचे पावित्र्य वषार्नुवर्षे अखंडपणे व अव्याहतपणे जोपासले आहे. गावाचे व भाविकांचे एकमेव श्रद्धास्थान असणारे हे सिद्धनाथ मंदिर त्यामुळेच एक जागृत देवस्थान म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे.

मानवी समाजामध्ये ज्या पद्धतीने हळदी-समारंभ, विवाह व नंतर वरात आदी कार्यक्रमांनी विवाह सोहळा होतो, त्याच पद्धतीने येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरी यांचा हळदी समारंभ, विवाह व वरात हे कार्यक्रम होतात. दिवाळी पाडव्यादिवशी हळदी समारंभ पार पडला. त्यानंतर कार्तिक शुद्ध 12 तुलसी विवाहादिवशी श्रींचा विवाह सोहळा झाला आणि आज मार्गशीर्ष शुद्ध एक शनिवार दि. 8 डिसेंबर रोजी विवाहानंतरची वरात म्हणजेच श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरीची रथयात्रा होत आहे.

दणकट, मजबूत आणि भव्य अशा लाकडी चंदनाच्या रथामध्ये श्रींच्या उत्सवमूर्ती दुपारी 12 वाजता बसवल्या जातात. रथाला मोठे जाडजूड दोर बांधून माणसांनी हा रथ ओढला जातो. श्रींच्या पंचधातूच्या उत्सवमूर्ती घेऊन रथामध्ये बसण्याचा मान येथील गुरव समाजाला आहे. याबरोबरच रथाची देखभाल करण्याचा व रथावर बसण्याचा मान येथील राजेमाने घराण्याला असून हा रथ ओढण्याचा मान येथील माळी समाज व बारा बलुतेदारांनाही आहे. माणगंगेच्या पात्रातून शहराला उजवी प्रदक्षिणा घालून दुपारी 12 वाजता सुरू झालेली श्रींची रथातील वरात रात्री बाराच्या पुढे मूळ ठिकाणी येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)