20 कोटींची खंडणी मागणारा मुख्य आरोपी जेरबंद
मुलाला ठार मारण्याची दिली होती धमकी

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 3 – व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून 20 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणातील मुख्य आरोपीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. ही कारवाई संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक पथकाच्या पश्‍चिम विभागाने केली आहे. शाहबाज फिरोज खान (29, रा. भवानी पेठ) असे आरोपीचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाहबाज खान याने साथीदारांच्या मदतीने भवानी पेठेतील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे खंडणीसाठी अपहरण केले होते. यानंतर फिर्यादीकडे 20 कोटींची खंडणी मागितली होती. सरतेशेवटी 15 लाख रुपये दिले नाही तर, मुलाला ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात सूरज चव्हाण (25, रा. हडपसर), अरबाज फिरोज खान (27, रा. भवानी पेठ), साहिल अब्दुल शेख (23, रा. कोंढवा) यांना अटक करण्यात आली होती. हे सर्व सध्या येरवडा येथे न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाहबाज फिरोज खान व सूयश वाघमारे हे गुन्हा केल्यापासून फरार होते.

गुन्हा केल्यापासून ते सातत्याने त्यांची ठिकाणे बदलत होते. तसेच एका अनोळखी व्यक्तीचा मोबाइल घेऊन ते जवळच्या लोकांशी संपर्क साधत होते. दरम्यान, संघटित गुन्हेगारी विरोधी पथक (पश्‍चिम) येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुरुवारी गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी शकील शेख व संतोष क्षीरसागर यांना शाहबाज हा नांदेड सिटी येथे येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून शाहबाजला अटक करण्यात आली. दरम्यान, त्याने त्याच्या पकडलेल्या साथीदारांना जेलमधून सोडवण्यासाठी पैशाची आवश्‍यकता असल्याने मुंढवा व नाना पेठ या ठिकाणी जबरी चोरी केल्याची माहिती दिली आहे. त्याच्या ताब्यातून रोख 5 लाख 83 हजार, एक मोबाइल, कोयता व दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

शाहबाज याच्याविरुध्द डेक्कन, समर्थ, स्वारगेट, कोंढवा, वानवडी पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरीचे चार, खुनाच्या प्रयत्नाचा एक, चोरीचा एक व दुखापतीचा एक असे सात गुन्हे दाखल आहेत. तर, याच्या साथीदार सूयज वाघमारे याला काही दिवसांपूर्वीच गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली आहे. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, उत्तम बुदगुडे व पथकातील पोलीस कर्मचारी शकील शेख, संतोष क्षीरसागर, सर्फराज शेख, सहायक पोलीस फौजदार राजेंद्रसिंह चौहान, निलेश शिवतरे, रमेश चौधर, कैलास साळुंके, अजय उत्तेकर, विवेक जाधव, प्रविण पडवळ, सुनील चिखले, प्रशांत पवार, संतोष देशपांडे, विजय गुरव, किरण ठवरे, संभाजी गहगावणे यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)