आचारसंहिता भंगाच्या 444 तक्रारी

-“सी-व्हिजिल’ ऍप : नागरिकांचा मिळतोय चांगला प्रतिसाद
– ऍपमध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याचा दावा

पुणे – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातारणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने “सिटीजन व्हिजिलन्स’ अंतर्गत “सी-व्हिजिल’ हे नवे मोबाइल ऍप विकसित केले आहे. पुणे जिल्ह्यातून या ऍपवर आतापर्यंत 444 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यावर योग्य ती कार्यवाही केली जात आहे.

लोकसभा निवडणूक अधिकाधिक पारदर्शकपणे व्हावी, तसेच निवडणुकीत कोणतेही अनधिकृत प्रकार होऊ नये. लोकसभा निवडणुकीत 100 टक्के आचारसंहितेचे पालन सर्व उमेदवारांनी करावे, यासाठी आयोगाने विविध प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणुकीतील गैरप्रकाराची माहिती आयोगाला समजावी, या हेतूने निवडणूक आयोग आता नागरिकांची मदत घेत आहे. निवडणूक आयोगाकडून प्रथमच हे नावीन्यपूर्ण ऍप देशातील नागरिकांना उपलबध करून देण्यात आले आहे.

आचारसंहितेच्या उल्लंघनाची माहिती देण्यासाठी या ऍपद्वारे फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ काढून तो “अपलोड’ करावा लागणार आहे. यासाठी मोबाईलमध्ये इंटरनेट सेवा आणि जीपीएस लोकेशन सुविधा सुरू असणे आवश्‍यक आहे. फोटो “अपलोड’ झाल्यावर त्या स्थानाचे लोकेशन संबंधित मतदारसंघातील भरारी पथकाला समजणार आहे. फोटो “अपलोड’ केल्यावर वापरकर्त्याला एक युनिक आयडी मिळणार आहे. त्याद्वारे ते मोबाईलवर तक्रारीचा पाठपुरावा करू शकणार आहे. दरम्यान, तक्रार करणाऱ्या नागरिकांची माहिती अथवा ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान समाप्तहोईपर्यंत हे ऍप नागरिकांना वापरता येणार आहे.

भरारी पथकाला 5 मिनिटांत मिळणार माहिती

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन भरारी पथके असणार आहे. या ऍपद्वारे आलेली माहिती या भरारी पथकाला पाच निनिटांत मिळणार आहे. जर तक्रार योग्य असेल तर 100 मिनिटांत या तक्रारीचे निवारण केले जाणार आहे. “सी-व्हिजिल’ ऍपला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हे ऍप नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा ठरत आहे. कोणताही नागरिक निवडणुकीदरम्यान होणाऱ्या आदर्श आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ऍपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन करू शकतो.

प्रशासन म्हणते…

या “सी-व्हिजिल’ ऍपमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. या ऍपचा वापर करणाऱ्या नागरिकांकडील मोबाइल हॅन्डसेटचा प्रकार, मोबाइल इंटरनेट सेवेची गती, मोबाइल नेटवर्क पुरवठादार कंपनी, स्थाननिहाय नेटवर्क कव्हरेज आदी घटकांवर इंटरनेट स्पीड अवलंबून असतो. या घटकांमुळे तेथील परिस्थितीनुसार ऍपवर छायाचित्र, चित्रीकरण “अपलोड’ करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत फरक असू शकतो, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)