कराड तालुक्‍यातील 44 पाझर तलाव पडले कोरडे

प्रशासनाचे अधिकारी दीड महिना निवडणुकीच्या कामात अडकल्याने दुर्लक्ष; ग्रामस्थांना बसताहेत पाणीटंचाईच्या झळा

कराड – मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून कराड तालुक्‍यातील काही गावांना पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. शेती व पिण्यासाठी मोठा आधार ठरणाऱ्या तालुक्‍यातील 61 पाझर तलावांपैकी 44 तलाव कोरडे पडू लागले आहेत. उर्वरित 17 तलावात केवळ 15 ते 20 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तालुक्‍यात टंचाईसदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र प्रशासनाचे अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामामध्ये गुंतल्याने याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. परिणामी अनेक गावातील लोकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या.

फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या मध्यावरच 44 पाझर तलाव कोरडे पडल्याने काही अंशी पाणीसाठा शिल्लक असलेल्या गावांमधून भीती व्यक्‍त केली जात आहे. पाणीटंचाईची परिस्थिती सांगण्यासाठी पंचायत समितीत लोकांना खेटे घालावे लागले. मात्र तेथे अधिकारीच उपस्थित नसल्याने लोकांमधून नाराजी व्यक्‍त होत होती. मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रकिया पार पडल्याने आता तरी अधिकाऱ्यांनी टंचाई आढावा दौरा करावा, अशी मागणी होत आहे.

पाझर तलावांवर अवलंबून असणाऱ्या शेकडो हेक्‍टर क्षेत्रावरील पिके धोक्‍यात आली आहेत. मार्च एप्रिल महिन्यात यातील बहुतेक पाझर तलाव प्रतिवर्षी आटतात. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होतो. गतवर्षी अनेक गावांनी पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागास टॅंकर सुरू करण्याबाबत पाठपुरावा करूनही एकही टॅंकर सदर गावांसाठी सुरू करण्यात आला नव्हता. संपूर्ण उन्हाळाभर लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली होती. यावर्षी तरी अशी अवस्था होऊ नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे होते. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे अधिकारीच त्या कामात गुंतल्याने यावर्षी टंचाईसदृश्‍य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

मसूर भागातील किवळसह, घोलपवाडी, निगडी, चिखली, गायकवाडवाडी, रिसवड, अंतवडी, शामगाव, गोसावेवाडी, बानुगडेवाडी, माळवाडी, यादववाडी, खोडजाईवाडी या गावांना मे महिन्याच्या कालावधीत पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. याबाबत दक्ष घेऊन संबंधित गावात टॅंकरची व्यवस्था करावी. तसेच शेतीसाठीही पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सतरा तलावांमध्ये 15 ते 20 टक्के पाणीसाठा

पाण्याचा एकही थेंब शिल्लक नसलेल्या पाझर तलावामध्ये अंतवडी 1 व 2, शामगाव नं. 1, 2 व 3, किवळ आदी तालावांचा समावेश आहे. 17 तलावांमध्ये 15 ते 20 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये वाघेरी नं. 1, कासारशिरंबे, म्हासोली, येणपे नं. 2, अकाईचीवाडी गोटेवाडी, मेरवेवाडी, म्हासोली, गायकवाडवाडी, साळशिरंबे, जिंती, पाचुंद 1 आदी तलावांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)