‘हम दो हमारा एक’ चे प्रमाण दोन ते तीन टक्केच
पुणे- देशात साधारण 1975 च्या दशकात इंदिरा गांधी सरकारच्या काळात “हम दो हमारे दो’ चा नारा दिला गेला. शासनाकडून लोकसंख्या आवाक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जाऊ लागले. मात्र त्यानंतर तब्बल 43 वर्ष झाल्यानंतरही अद्यापही राज्यात हम दो हमारे दो चाच ट्रेंड सुरु असल्याचे दिसत आहे. राज्यातील दोन मुलांवर मूल न होण्याची शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांच्या आकडेवारीवरुन ही बाब समोर येते आहे.
राज्यातील प्रसुतीनंतर महिलांमध्ये दोन मुलांनंतर मूल बंद होण्याची शस्त्रक्रिया करुन घेण्याचे प्रमाण अजुनही सर्वाधिक आहे. एक मूलावर शस्त्रक्रिया करणारे तुलनेने बरेच कमी आहे. मात्र सध्या शस्त्रक्रियेला अन्य पर्याय निघाले असल्याने अनेक सुशिक्षित पालक त्या पर्यायांचाही उपाय करताना दिसतात.
डॉ.नंदकुमार देशमुख, सहायक संचालक
राज्य कुटुंब कल्याण विभाग
राज्याच्या कुटुंब कल्याण विभागातर्फे राज्यात दरवर्षी किती महिलांची प्रसुती होते याची माहिती घेतली जाते. यामध्ये खासगी रुग्णालयात होणाऱ्या प्रसुतीची आकडेवारी काही प्रमाणात असते. परंतु सरकारी दवाखान्यांतील संपूर्ण आकडेवारी कुटुंब कल्याण विभागाकडे असते. लोकसंख्येशी काढलेल्या गुणोत्तरानुसार राज्यात दरवर्षी साधारण वीस लाख महिलांची प्रसुती होते. त्यापैकी पन्नास ते साठ टक्के महिलांची प्रसुती ही सरकारी रुग्णालयात केली जाते.
या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या चार वर्षात साधारण पाच लाख महिला दरवर्षी मूल बंद होण्यासाठीची शस्त्रक्रिया करतात. त्यातील जवळपास तीन लाख महिला या दोन मुलांवर ही शस्त्रक्रिया करतात तर दहा ते बारा हजार महिला या एका मुलावर ही शस्त्रक्रिया करतात. तर तीन व त्यापेक्षा अधिक मुलांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांची संख्या ही साधारण दीड लाख असते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा