40,000 च्या टप्प्यावर पडणारे काही प्रश्‍न (भाग-2)

40,000 च्या टप्प्यावर पडणारे काही प्रश्‍न (भाग-1)

निर्देशांक हा अनेकांचे छातीचे ठोके देखील वाढवत असतो. अनेकांना धाकधूक असते ती म्हणजे बाजारातील करेक्‍शन बद्दल.आणि अप्रत्यक्षपणे कमी होणारी त्यांच्या पोर्टफोलिओची किंमत. या अनुषंगानं, अशा परिस्थितीत अनेक प्रश्‍न गुंतवणूकदारांना पडत असतात, त्याचा या लेखात आढावा घेऊ.

बाजारातून गुंतवणूक काढून घेऊन ती रक्कम रोख्यांमध्ये गुंतवावी का ?
याचं उत्तर बाजारातील गुंतवणुकीतून ठेवलेल्या अपेक्षेवर व आतापर्यंत मिळालेल्या परताव्यावर अवलंबून आहे. उदा. जर सन 2013 मध्ये गुंतवणूक करताना उद्दिष्ट हे 50% परताव्याचं असेल व जर आतापर्यंत त्या योजनेनं किंवा त्या शेअर्सनं जर 75% किंवा 100% परतावा दिला असेल, तर नक्कीच ती गुंतवणूक काढून घ्यावयास हवी, कारण गुंतवणुकीचं उद्दिष्ट येथे पूर्ण होत आहे. अशावेळी ती गुंतवणूक काढून एखाद्या जोखीमरहित गुंतवणूक पर्यायात ठेवावी म्हणजे उद्दिष्ट (Goal Planning) पूर्ण करण्यास त्याची तरलता राहील. त्याचप्रमाणं एखाद्या व्यक्तीच्या जोखीम ऐपतीनुसार जर त्या व्यक्तीची शेअर्समधील गुंतवणूक ही एकूण गुंतवणुकेच्या 70% असेल व ती गुंतवणूक वाढून 80% झाल्यास अशी जास्तीची 10% गुंतवणूक काढून ती रोख्यांमध्ये किंवा कमी जोखमीच्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये वळवावी, जेणेकरून इक्विटीमधील एक्‍स्पोजर वाढणार नाही.

कोणत्या स्थिर उत्त्पन्न देणाऱ्या पर्यायात गुंतवणूक करावी का ?
जर एखाद्याचा कल हा नियमित उत्त्पन्नाकडं असेल तर कर दायित्व, महागाई वाढीचा दर (हा साधारणपणे एखादा टक्का जास्त धरावा) व गुंतवणुकीवरील परतावा या सर्व बाबी गृहीत धरून बाजारातील नावाजलेल्या योजनेचाच विचार करावा, जास्त व्याजापायी कोणताही मोह टाळावा. (मुदत ठेवीचा दर हा महागाईच्या दरावर मात करतोय का, ते तपासावं, त्याचप्रमाणं महिना 5 – 50% कमावून देणाऱ्या भामट्यांपासून देखील दूर राहावं.)

केलेल्या शेअर्समधील गुंतवणूक काढून घेऊन पुन्हा त्यांचे भाव खाली आल्यास पुन्हा त्याच शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का?
जर आपण ठरवलेलं उद्दिष्ट शेअर्सच्या भावानं गाठलं असेल व बाजारात पुढील दिवसांसाठी धास्ती असेल किंवा काही कारणांमुळं त्या कंपनीच्या शेअर्सच्या भावातील वाटचाल मनात शंका उत्पन्न करत असेल, तर नक्कीच अशी गुंतवणूक काढून घेण्यास प्राधान्य द्यावं; आणि जर त्या कंपनीच्या बाबतीत, कंपनीच्या कार्यप्रणालीवर व कंपनीच्या फायदेशीरतेवर प्रबळ विश्‍वास असेल (अभ्यासानं) तर पुन्हा योग्य भावात (नुसते भाव पडले म्हणून नाही) त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यास हरकत नसावी. (उदा. टाटा मोटर्स, 360 घेऊन 460 वर विक्री व आता पुन्हा 260 ला खरेदी).

गुंतवणूक केलेल्या शेअर्सचे भाव प्रचंड वाढल्यास केलेली गुंतवणूक काढून ती रक्कम दुसऱ्या शेअर्समध्ये वाळवावी का?
ही गोष्ट करताना प्रामाणिक गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्यावी. कारण एखादा शेअर योग्य भावात विकून आपला फायदा पदरात पडून घेतल्यास ती गुंतवणूक पुन्हा त्याच कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवण्याऐवजी इतर चांगल्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवावी, ज्याच्या भावात वाढ होण्याची शक्‍यता जास्त आहे. याचा अर्थ असा नाही की, दर महिन्यास आपली गुंतवणूक फिरवत बसावी. अनेक ब्रोकर्स याबाबतीत चालना देत असतात, जोपर्यंत आपलं उद्दिष्ट त्या शेअर्समधील गुंतवणुकीद्वारे गाठलं जात नाही तोपर्यंत विनाकारण त्यातील गुंतवणूक काढून घेण्यास अधीरता दाखवू नये.

गुंतवणूक करण्यासाठी किती व कशाप्रकारे शेअर्स निवडावे ?
सर्वांत जास्त विचारला जाणारा हा प्रश्‍न आहे. ढोबळमानानं, पोर्टफोलिओमध्ये जितके शेअर्स जास्त तितकी रिस्क कमी; परंतु एकूण परतावा कमी. फोकस्ड पोर्टफोलिओ हा भरमसाठ शेअर्स असलेल्या पोर्टफोलिओच्या तुलनेत कमी परतावा देऊ शकतो. उदाहरण घ्यायचेच झाले तर सेन्सेक्‍स व निफ्टी या दोन निर्देशांकांचे घेऊ शकता. सेन्सेक्‍समध्ये उत्तम असे निवडलेले, मोजके 30 शेअर्स आहेत; तर निफ्टीमध्ये 51. निफ्टी नं 31 ऑगस्ट 2017 ते 31 ऑगस्ट 2018 मध्ये 17% वाढ नोंदवलीय तर तीच वाढ सेन्सेक्‍समध्ये 22 टक्क्‌यांच्या जवळपास आहे. त्यामुळं प्रत्येक उत्तम कंपनीचा शेअर हा आपल्या जवळ असावाच असा अट्टाहास न ठेवता आगामी काळात जी क्षेत्रं उत्तम परतावा देऊ शकतात अशांचे मोजकेच शेअर्स घेणं जास्त फायद्याचं ठरू शकतं. (अमेरिकी एफडीएच्या बंधनांमुळं व त्याच्या होणाऱ्या नकारात्मक परिणामांमुळं औषधी कंपन्यांचे शेअर्स न घेता रुपयाच्या घसरणीचा फायदा होणाऱ्या सॉफ्टवेअर कंपन्यांच्या शेअर्सनी मागील दोन वर्षांत उत्तम परतावा दिला आहे.) निफ्टी फार्मा निर्देशांक मागील दोन वर्षांत 10-11% घसरला तर निफ्टी आयटी निर्देशांकानं 32.5% परतावा दिला. बाजाराचा निर्देशांक 40 हजाराकडं सरकतोय व अनेक तज्ज्ञ लोक 100000 ची अपेक्षा बोलून दाखवत आहेत. त्यामुळं आपण अल्पसंतुष्ट राहायचं की लाभातून लोभात जायचं ह्याहीपेक्षा बाजारातून आपली आर्थिक उद्दिष्टं साध्य होत आहेत का, हे पाहणं जास्त फायद्याचं ठरू शकेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)