राज्यातील 40 लाख मतदारांची नावे गायब?

पुणे – पूर्वी मतदार यादीत नाव नोंदविले आहे, पण आता मतदार यादीत नाव नाही, अशा मतदारांची संख्या राज्यात 39 लाख 27 हजार 882 इतकी आहे. मतदार यादीतून ही नावे गायब झाली असून एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 4.6 टक्के असल्याचा दावा मतदार जागृती परिषदने केला आहे.

संस्थेने योजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. यावेळी फोरम फॉर कॉन्स्टिट्यूशनल नॅशनॅलिझमचे प्रशांत कोठडिया, श्रीरंजन आवटे, राष्ट्रसेवा दलाच्या साधना शिंदे, संदेश भंडारे, संदीप बर्वे आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर हैदराबाद येथील “दि नो व्होटर्स लेफ्ट बिहाइंड’ या संस्थेच्या वतीने अनेक राज्यांतील मतदार यादीतून गायब झालेल्या नावांचा मागोवा घेण्यासाठी डिसेंबर 2018 मध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये सर्व स्तरांतील नावे समाविष्ट करण्याबाबत कमतरता राहून गेल्याचे आढळल्याचे कोठडिया यांनी सांगितले.

या संस्थांनी दोन स्तरांवर अभ्यास केला. त्यानुसार राज्यातील सुधारित मतदार यादी आणि जनगणनेची आकडेवारी यांचा तुलनात्मक अभ्यास केला गेला. त्याचप्रमाणे नागपूर दक्षिण पश्‍चिम, नागपूर दक्षिण, काटोल आणि नांदेड उत्तर या चार लोकसभा मतदार संघामध्ये सॅम्पल सर्व्हेदेखील देण्यात आला. या सर्व अभ्यासातून असे लक्षात आले, की या चार लोकसभा मतदार संघातील एकूण 39 लाखांहून अधिक मतदारांपैकी 17 लाख मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याची बाब लक्षात आली आहे. तर मतदार ओळखपत्र असूनही सुमारे 2 टक्के मतदारांची नावे मतदार नसल्याचे निदर्शनास आले आहे.

मुदतवाढ द्यावी
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीतील या घोळाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ज्यांची नावे वगळली गेली आहेत, ती यादीत समाविष्ट करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी मतदार जागृती परिषदेने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)