40 कोटींचा निधी मिळूनही घोड कालव्यांची दुरुस्ती का नाही? 

आमदार राहुल जगताप : घोड कालव्यांमधील काटेरी झाडे-झुडपे हटविण्यास सुरुवात
 11 पोकलेन, 4 जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई सुरू

श्रीगोंदा – घोड धरणाचे मुख्य कालवे 40 कोटींचा निधी येऊनही दुरूस्त होऊ शकले नाहीत. अनेक वर्षे कालवे दुरूस्त नसल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यातच पहिला निधी पडला पण त्याचा उपयोग झाला नसला तरी त्यावर दुसरा निधी पडणार नसल्याचे लक्षात घेऊन आपण सरकारकडे पाठपुरावा करून घोड कालव्याची दुरुस्ती सुरू केली आहे. कालवा दुरुस्तीसाठी 11 पोकलेन, 4 जेसीबी मशिनच्या साहाय्याने हे काम सुरू आहे.

श्रीगोंदा तालुक्‍यातील घोड कालव्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे-झुडपे उगवलेली आहेत. काही भागात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो. सध्या पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई जाणवते. अशा परिस्थितीत जर पाण्याचा अपव्यय झाला तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते ही बाब लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व शेतकऱ्यांना पाण्याचा पुरेपूर फायदा होण्यासाठी कॅनॉलमधील काटेरी झाडे-झुडपे व गाळ काढणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन आपण विशेष प्रयत्नांतून घोड कॅनॉलच्या दुरुस्तीचे काम आज सुरू केले, असे आ. जगताप यांनी सांगितले.

यामध्ये गाळ काढणे, भराव करणे व काट्या काढण्यात येणार आहेत. 11 पोकलेन, 4 जेसीबी मशिनद्वारे हे काम सुरू करण्यात आलेले आहे. आपण क्षेत्रीय कर्मचारी व अधिकाऱ्यांसमवेत घोड डावा कालवा कि. मी. क्र. 4 येथील यांत्रिकी विभागाद्वारे कालव्याच्या पुनर्स्थापनेच्या कामाची पाहणी केली. यावेळी उपअभियंता प्रकाश लंकेश्‍वर, शाखा अभियंत्रा वाघुले, शिरवाळे व पालवे, शहाजी गायकवाड, भैय्या वाबळे, कुमार लोखंडे, मनीष गायकवाड, आदी उपस्थित होते.

कुकडीतून आवर्तन सोडण्याची मागणी
कुकडी धरणात सध्या चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे कुकडीतून आता शेतीचे आवर्तन सोडण्यासाठी आग्रही राहणार आहे. आवर्तन सोडण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. शिवाय, घोड धरणात आता उपयुक्‍त पाणीसाठा आला असून पुरेसा साठा झाल्यावर घोडमधूनही शेतीला पाणी देण्यासाठी आग्रही राहणार असल्याचे आ. राहुल जगताप यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)