40 कोटींचा ‘डबा’ चोरीला जातो तेव्हा

निजामाचा चोरीला गेलेला जेवणाचा डबा सापडला

चोरटे रोज या डब्यातून घेत होते जेवण

आंतरराष्ट्रीय बाजारातील डब्याची किंमत 35 ते 40 कोटी

हैदराबाद: हैदराबाद मधील निजामाच्या संग्रहालयातून आठवडाभरापुर्वी चोरीला गेलेल्या सोन्याच्या डब्याचा उलगडा झाला असून हा डबा पोलिसांनी दोन चोरट्यांच्या ताब्यातून परत मिळवला आहे. चार किलो सोन्याच्या या पाच खणी डब्याला हिरे, माणिक आणि पाचुंनी सजवण्यात आले आहे. या डब्याच्या सोन्याचीच किंमत सुमारे एक कोटी रूपये आहे तथापी त्याचे अमुल्य ऐतिहासिक महत्व लक्षात घेता या डब्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मुल्य 35 ते 40 कोटी रूपये इतके आहे. विशेष म्हणजे चोरटे आपले दैनंदिन जेवणही याच डब्यातून अन्न आणून करीत असत ही बाब पोलिस तपासांत निष्पन्न झाली आहे.

या संग्रहालयातून या दोन्ही चोरट्यांनी निजामाची सोन्याची कपबशी आणि सोन्याचा चमचाही चोरला होता हा साराच माल पोलिसांना परत मिळाला आहे. हे दोघेही रेकॉर्डवरचे सराईत घरफोडे असून त्यांच्यावर घरफोडीचे यापुर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. निजामाच्या संग्रहालात त्यांच्यापैकी एकाने एक महिन्यापुर्वी पर्यटक म्हणून भेट दिली होती त्यावेळी त्यांना तेथे हा डबा आणि अन्य साहित्य दिसले.

त्यांनी नंतर संग्रहालयाच्या मागील बाजुच्या भिंतीच्या व्हेन्टिलेटरची चौकट काढून तेथे प्रवेश मिळवला व हा ऐवज घेऊन त्यांनी पोबारा केला. संग्रहालाच्या परिसरात एकूण 32 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याचाही अभ्यास त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी तोंडावर बुरखा घालून ही चोरी करताना कॅमेऱ्यांचा अँगलही बदलला होता त्यामुळे त्यांची तेथे नोंद झाली नाही. पण एका कॅमेऱ्यात ते चोरीचा ऐवज घेऊन मोटार सायकलवरून तेथून निघून जातानाचे चित्रण झाले आहे. त्यावेळी मागच्या सीटवर बसलेला एक जण मोबाईलवर बोलत असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी त्या परिसरातील सर्व दोनशे टॉवरवरील कॉल रेकॉर्ड वरून आरोपींचा माग घेण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्नही फसला कारण आरोपींनी पोलिसांची दिशाभुल करण्यासाठीच केवळ कानाला मोबाईल लावला होता. त्यांच्या त्या मोबाईलमध्ये सीम कार्डच नव्हते. हा ऐवज घेऊन आरोपी मुंबईला गेले. त्यांनी तेथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन दिवस वास्तव्य करून हा ऐवज तेथील बाजारात विकण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तेथे योग्य खरेदी दार मिळाला नाही म्हणून ते हैदराबादला परत आले त्यावेळी ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

त्यांचे जुने रेकॉर्ड आणि त्यांच्या दुचाकीवरून पोलिसांनी त्यांचा माग काढला. या चोरीतून चोरट्यांच्या हाताला काही लागले नाही पण त्यांनी निजामाच्या थाटात हिरे माणक्‍यांनी सजवलेल्या सोन्याच्या डब्यातून जेवण करण्याची ऐट मात्र भागवली. ही चोरी उघड झाल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. हैदराबाद पोलिसांनी त्याच्या तपासासाठी 22 पथके तयार केली होती. 2 सप्टेंबरच्या रात्री हा चोरीचा प्रकार घडला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)