उर्वरित कॅन्टिनचालकांना दंड भरण्यास मुदत
पुणे – मगरपट्टा सिटीमधील एका आयटी कंपनीमधील केटरिंग चालविणाऱ्या व्यक्तींकडे परवाना नसल्याने अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली. या 14 केटरिंग चालकांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस अन्न व औषध प्रशासनाने बजावली होती. यातील चार केटरिंग चालकांनी एकूण एक लाख रुपयांचा दंड प्रशासनाकडे भरला आहे. तर उर्वरित केटरिंग चालकांना दंड भरण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अनेक राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्या कार्यरत आहे. यामध्ये हजारो कर्मचारी काम करत आहेत. यातील कर्मचाऱ्यांना केटरिंगमार्फत जेवणाची व्यवस्था करण्यात येते. हे केटरिंगचालक बाहेरील किचनमध्ये स्वयंपाक तयार करून आयटी कंपन्यांमध्ये जेवण आणून देतात. आयटी कंपनीमध्ये काऊंटर तयार करून कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था पुरविण्यात येतात.
काही आयटी कंपन्यांमध्ये तीन शिफ्टमध्ये काम सुरू असते. या कर्मचाऱ्यांसाठी सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, सायंकाळी पुन्हा नाश्ता त्याचबरोबर रात्रीचे जेवण अशी व्यवस्था करण्यात येते. त्यासाठी आयटी कंपन्या केटरिंग चालकांमार्फत जेवणाची व्यवस्था करते. त्यासाठी केटरिंग नेमणूकही आयटी कंपनीकडून करण्यात येते. अन्न व औषध प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली. यामध्ये पहिल्यांदाच आयटी कंपनीमधील केटरिंग चालकांवर दंडाची कारवाई केली आहे.