4 हजार ग्राहकांकडे 75 लाख थकीत

थकीत वीजबिलाविरोधात धडक वसुली मोहीम : महावितरणकडून धडक कारवाई

शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथील महावितरण कार्यालयाअंतर्गत असेलल्या गावांमध्ये चार हजार थकबाकीदार ग्राहक आहेत. या ग्राहकांचे सुमारे पंच्याहत्तर लाख रुपये वीजबिल थकीत असल्यामुळे महावितरण कंपनीच्या वतीने वसुली पथक नेमण्यात आले आहे. पथकाच्या वतीने थकीत वीजबिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. शिक्रापूर येथे असलेल्या महावितरण कार्यालयअंतर्गत असलेल्या शिक्रापूर, गणेगाव खालसा, बुरुंजवाडी, पिंपळे जगताप, कोंढापुरी, जातेगाव बुद्रुक, पिंपळे खालसा, मुखई, करंदी, जातेगाव खुर्द या गावातील अनेक वीजग्राहकांचे अनेक दिवसांपासून वीजबिल थकलेले असून थकबाकीचा आकडा पंच्याहत्तर लाख रुपयांच्या वर जाऊन पोहचला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या वतीने केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांच्या वतीने वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्‍वर ढाकणे, कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्‍वर पांडे, कनिष्ठ अभियंता अभिषेक मढावी, विशाल शिंदे, दत्तात्रय ढाकरे, संगीता चव्हाण, रुपाली ढोबळे यांच्यासह तीन वेगवेगळे वसुली पथक तयार करण्यात आले आहेत. यामध्ये महिलांचे स्वतंत्र वसुली पथक बनविण्यात आले आहे. या पथकाद्वारे थकीत वीजबिल वसुली सुरू करण्यात आली आहे. सध्या वीजबिल वसुली सुरू असून जे थकबाकीदार ग्राहक वीजबिल भरणार नाहीत त्यांचा वीजपुरवठा खंडित करून त्यांचे वीजमीटर जप्त करण्यात येणार आहे. वीजमीटर जप्त केल्यानंतर जर त्या ग्राहकाने शेजारील नागरिकांकडून वीज घेतल्यास त्यांचा देखील विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे यावेळी नेमण्यात आलेल्या पथकाकडून सांगण्यात आले आहे. वीजबिल थकबाकी असलेल्या ग्राहकांमध्ये एक वर्षापासून वीजबिल थकीत असणाऱ्यांचा देखील समावेश असून वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.

  • मोठ्या थकबाकीदारांवर करडी नजर
    शिक्रापूर येथील महावितरण कार्यालयांतर्गत असलेल्या गावांमध्ये अनेकांचे वीजबिल थकले आहे. यामध्ये काही ठिकाणचे स्थानिक व्यावसायिकांचा देखील समावेश आहे, त्यामुळे सध्या सुरु असलेल्या वसुली मोहिमेमध्ये मोठ्या थकबाकीदारांवर करडी नजर असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. शिक्रापूर महावितरण कार्यालयअंतर्गत वसुली सुरू केली आहे. अनेक ग्राहक त्यांच्या मीटरमध्ये त्रुटी असल्याचे व जादा वीजबिल येत असल्याबाबतच्या तक्रारी करत असल्याचे वीज वितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्‍वर ढाकणे यांनी सांगितले. सध्या दुरुस्तीचे कामकाज देखील मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाकडून होत आहे. दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवसाची दुरुस्ती यापुढे होणार नाही. त्यामुळे ज्या ग्राहकांच्या मीटर तसेच लाईट बिलाबाबत तक्रारी असतील त्या ग्राहकांनी विनाविलंब महावितरण वितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील ग्राहकांना करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)