डॉ.तनपुरे कारखान्यावर पुन्हा जप्तीची टांगती तलवार
डॉ.सुजय विखे यांचे नियोजन कोलमडले; कारखाना अडचणीत येणार

नगर – राहुरी तालुक्‍यातीची कामधेनू अशी ओळख असलेल्या डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा एकदा जप्तीचे ढग जमू लागले आहेत. जिल्हा बॅंकेच्या कर्जाचा पहिलाच हप्ता 11 कोटी भरण्यास कारखान्याकडून टाळाटाळ करण्यात आली. जूनअखेर हा हप्ता भरणे आवश्‍यक असताना कारखाना व्यवस्थापनाने केवळ 65 लाख रुपये भरून बॅंकेची बोळवण केली. कराराप्रमाणे कारखान्याने हप्ता न भरल्याने आता बॅंक काय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव व डॉ.पद्‌मश्री विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांचे नियोजन कोलमडल्याने आता कारखाना अडचणीत येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

बॅंकेने कारखाना व्यवस्थापनाला पहिला हप्ता पूर्णपणे भरण्याचे स्मरणपत्र दिले आहे; परंतु व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही हालचाल होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता बॅंकेने पुढाकार घेवून व्यवस्थापनाला चर्चेसाठी बोलविले असून येत्या 20 किंवा 21 जुलै रोजी ही चर्चा अपेक्षित असल्याचे समजते. हा कारखाना डॉ. विखे यांनी चालविण्यास घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सध्याचे संचालक मंडळ काम करीत आहे. जिल्हा बॅंकेची 88 कोटीची थकबाकी कारखान्याकडे आहे. गेल्यावर्षी बॅंकेने ही थकबाकी वसुली करण्यासाठी जप्तीची कारवाई केली. कारखाना मशिनरीसह सर्व चल, अचल मालमत्ता जप्त करून, जिल्हा बॅंकेने ताब्यात घेतली होती. या जप्तीच्या कारवाईला स्थगिती मिळावी, म्हणून डॉ. विखे यांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. थकीत कर्जाचे पुनर्गठण करून दहा हप्ते करावेत, अशी मागणी त्यांनी बॅंकेकडे केली. त्यानुसार जप्तीच्या कारवाईला स्थगिती देवून बॅंकेने कर्जाचे पुनर्गठण करण्याचे मान्य केले. बॅंकेचे 88 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले. तसेच दहा वर्षांसाठी दहा हप्ते ठरविण्यात आले. त्यानुसार बॅंकेने कारखान्याबरोबर करारदेखील केला. या करारात बॅंकेने लादलेल्या अटी व शर्ती कारखान्याने मान्य केल्या होत्या. त्यात प्रत्येक दर हप्ता हा 11 कोटीचा राहणार असून तो नियमित भरण्याचे मान्य करण्यात आले होते. डॉ. विखे यांनी त्या दृष्टीने नियोजनदेखील केले. त्यानंतर कारखाना सुरू झाला. कारखान्याने पहिला गळीत हंगाम आता पूर्ण केला आहे; परंतु बॅंकेचा पहिला हप्ता भरताना कारखान्याच्या नाकीनऊ आले आहेत. पहिलाच 11 कोटीचा हप्ता जूनअखेर भरणे गरजेचे होते; पण एवढी रक्‍कम न भरता कारखान्याने केवळ 65 लाख रुपये कर्जाची रक्‍कम जमा केली.
थकीत कर्जापोटी कारखाना बंद होता. कारखान्याच्या निवडणुकीत सत्तांतर होऊन डॉ. विखे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन झाले. विखे यांच्या ताब्यात कारखान्याची सत्ता आली. मोठा गाजावाजा करून डॉ. विखे यांनी कारखाना ताब्यात आणला खरा; पण आत कारखाना चालू करण्याचे दिव्य डॉ. विखे व संचालक मंडळाला पार पाडावे लागत आहे. आज बॅंकेचा पहिला हप्तादेखील कारखान्याला भरता आला नाही. त्यामुळे कारखान्याने बॅंकेच्या कराराचा भंग केला असून आता बॅंक काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

चार वर्षांनंतर पहिले गळीत

चार वर्षे बंद राहिल्यानंतर पहिलाच गळीत हंगाम कारखान्याने पूर्ण केला. 2 लाख 19 हजार टन उसाचे गाळप करण्यात आले. त्यातून 2 लाख 53 हजार 67 क्‍विंटल साखर पोती उत्पादित झाली. त्यापैकी 2 लाख 37 हजार 31 क्‍विंटल साखर पोत्यांची विक्री कारखान्याने केली असून आता 1 लाख 63 हजार क्‍विंटल साखर शिल्लक राहिली आहे. कारखान्याने आतापर्यंत 44 कोटींचे पेमेंट शेतकऱ्यांना दिले आहे.

एफआरपीदेखील थकीत
कारखान्याने 44 कोटी शेतकऱ्यांची देणी दिली असली, तरी अद्यापही एफआरपीप्रमाणे काही शेतकऱ्यांची देणी थकीत आहेत. दोन महिने झाले, तरी 1 कोटी 59 लाख 56 हजार रुपयांची देणी दिलेली नाहीत. त्यामुळे सध्या ते शेतकरी कारखान्यात खेट्या मारीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)