389 अवैध नळजोडांवर धडक कारवाई

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेने अवैध नळजोड धारकांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे. पाणीपुरवठा विभागाने आजपर्यंत 389 अवैध नळजोड तोडले असून त्यांचा पाणी पुरवठा बंद केला आहे. “ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्वाधिक म्हणजेच 78 अवैध नळजोड तोडले आहेत. तर, सर्वात कमी “अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 30 अवैध नळजोड तोडण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षात प्रचंड प्रमाणात वाढत आहे. सध्या शहराची लोकसंख्या 20 लाखाच्या घरात आहे. शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधागवयातून शहरातील निवासी विभागासाठी प्रतिदिन सरासरी 490 दश लक्ष लिटर पाणी उचलले जाते. तसेच एमआयडीसीकडून प्रतिदिन सरासरी 30 दश लक्ष लिटर पाणी घेण्यात येते. शहरातील पाणी पुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत होत आहे. शहरात सुमारे 16 हजार अनधिकृत नळजोड आहेत. चुकीच्या पद्धतीने नळ जोड घेतले आहेत. त्यामुळे 30 ते 40 टक्के पाण्याची गळती होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. तसेच दुषित पाणी पुरवठा देखील होतो. त्यासाठी महापालिकेने मे महिन्यापासून अनिधकृत नळजोडचे सर्वेक्षण केले. अनधिकृत नळजोड धारकांनी नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. तथापि, नागरिकांचा त्याला अल्प प्रतिसाद मिळाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनधिकृत नळजोडच्या सर्वेक्षणात शहरात केवळ 16 हजार अवैध नळजोड सापडले. यापैकी नियमित करण्यासाठी पाच हजार 14 जणांनी अर्ज केले होते. पाणी पुरवठा विभागाने दोन हजार 964 अर्ज मंजूर केले. तथापि, शहरातील अनधिकृत नळजोडची 16 हजार ही संख्या नगण्य असून यापेक्षा शहरात अधिक अवैध नळजोड आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने अवैध नळजोड धारकांवर धडक कारवाई सुरु केली आहे. आजपर्यंत 389 नळजोड तोडले असून त्यांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने धरणातील पाणी साठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरणातील पाणी पातळी दहा टक्‍क्‍यांनी घटली आहे. त्यामुळे शहरावर पाणी कपातीचे सावट असताना सर्रास पाणी चोरी सुरू आहे. त्यामुळे महापालिका यापुढील काळात अनधिकृत नळजोडांवरली कारवाई तीव्र करणार आहे.

क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केलेली कारवाई
“अ’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील 30 अवैध नळजोड तोडले आहेत. तर, “ब’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील 41, “क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 44, “ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 69, “इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 40, “फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 50, “ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 37 आणि “ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 78 असे एकूण 389 अवैध नळजोड तोडण्यात आले आहेत. त्यांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)