सायबर क्राईमची कामगिरी : सीम स्वाईपद्वारे घडला होता प्रकार; पंजाब मधून घेतले आरोपींना ताब्यात
सातारा- येथील एका कंपनीचा बॅंकेशी लिंक असणारा मोबाईल क्रमांक सीम स्वाईप करुन घेऊन कंपनीच्या बॅंक खात्यातील 37 लाख 78 हजार रुपये पंजाब, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतील विविध बॅंक खात्यामध्ये ट्रान्सफर करुन ऑनलाईन लूट करणाऱ्या टोळीतील दोघांना पंजाब येथून अटक करण्यात आली.

अभिषेक सुनील कुमार (वय 20, रा. झिरकपूर,मोहाली, पंजाब), यादविंदर नरेंद्र सिंग (वय 34, रा. झिरकपूर, मोहाली, पंजाब) अशी अटकेत असलेल्या संशयितांची नावे आहेत. मोळाचा ओढा येथील अभिजात इक्विपमेंट व अभिजात इंजिनिअर्स या कंपन्यांच्या अकाउंट व्यवस्थापकाच्या मोबाईलचे सीमकार्ड स्वाईप करून कंपनीच्या आयडीबीआय बॅंकेच्या खात्यातील 38 लाखाच्या रकमेवर या ऑनलाईन चोरट्यांनी डल्ला मारला होता.

कंपनीच्या व्यवस्थापकाच्या मोबाईवर “तुमचे सीमकार्ड अपडेट करण्यासाठी ऑर्डर देण्यात आली आहे. तुम्ही मागणी केली नसल्यास आणि सीम सुरू ठेवण्यासाठी “121′ या क्रमांकावर तातडीने फोन करा,’ असा मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये काही अन्य क्रमांकही होते. सीम बंद व्हायला नको म्हणून मॅनेजरनी तातडीने “121′ क्रमांकावर फोन केला व पुढील प्रक्रिया केली. ऑनलाईन भामट्यांनी त्या व्यवस्थापकाच्या सीमचा नंबर त्यांच्याकडील ब्लॅंक सीमवर कॉपी करून घेतला. त्यानंतर कंपनीच्या बॅंक खात्यातून 37 लाख 78 हजार रुपये लंपास केले होते.

याबाबत ऑगस्ट महिन्यात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हा गुन्हा तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सायबर पोलिस ठाण्याकडे देण्यात आला. सायबरच्या मदतीने या गुन्ह्यातील माहितीचे तांत्रिक़ विश्‍लेषण बारकाईने केले. तक्रारदार यांच्या बॅंक खात्यावरून आरोपींनी वेगवेगळ्या बॅंक खात्यावर एकाच दिवशी पैसे ट्रान्सफर केले होते. त्याच बॅंक खात्याची माहिती घेत सायबरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कदम व कर्मचाऱ्यांनी अल्पावधीत सर्व ठिकाणांची व संशयितांची माहिती संकलीत केली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ पंजाब राज्यातील झिरकपूर या ठिकाणी तपास पथक पाठवले. स.पो.नि. कदम व पोलिस हवा. विक्रांत फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, निखील जाधव यांचा समावेश असलेल्या तपास पथकाने पंजाब पोलिसांच्या मदतीने दोन संशयित युवकांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असताना संशयितांना दि. 7 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. सायबर पोलिस ठाण्याचे स.पो.नि. गजानन कदम यांच्यासह हवालदार शंकर सावंत, महेश शेटे, सचिन पवार, तुषार साठे, वर्षा खोचे, सुशांत कदम, अनिकेत जाधव, प्रविण अहिरे, ज्योती कोंडावळे, गणेश कचरे, मारुती अडागळे व यशोमती साळुंखे यांचे या कारवाईबद्दल जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, अप्पर अधिक्षक विजय पवार, पो.नि. पद्माकर घनवट यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)