लोणी काळभोर – अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लोणी स्टेशन येथील एका पानाच्या दुकानावर छापा टाकून 36 हजार 740 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी एकास अटक करून लोणी काळभोर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
शिवा मोनाप्पा सुतार (वय 46, रा. लोणी स्टेशन, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गणपत पांडुरंग कोकणे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, कोकणे यांच्यासमवेत त्यांचे सहकारी ए. एस. गवते व एस. एस. सावंत हे अन्न सुरक्षा मानदे कायद्यान्वये प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या कारवाई संदर्भात या परिसरात आले होते.
मंगळवारी (दि. 11) सकाळी 11. 30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटल जवळ असलेल्या श्रेयस पान सेंटर या दुकानाची तपासणी केली असता त्यांना तेथे विविध कंपन्यांचा एकूण 36 हजार 740 रुपये किंमतीचा गुटखा मिळून आला आहे. हा सर्व गुटखा जप्त करण्यात आला आहे. तसेच दुकान मालक शिवा सुतार याला पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे. यापूर्वी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीत अनेक वेळा गुटका व गुटखाजन्य पदार्थ वाहतूक व विक्री करताना पकडण्यात आले होते. तरीही बहुतांश पानटपऱ्या व किराणा मालाच्या दुकानात खुलेआम गुटका विक्री होत आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर हे करीत आहेत.