दोन लाखाचे श्‍वान चोरणारा गजाआड   (Word Count : 257   CC : 17  Page Baskets: –  Locations: -)
पुण-दि.16-
कोथरूड परिसरातील श्वान विक्रीच्या दुकानाचा दरवाजा उचकटून परदेशी जातीचे श्वान चोरणाऱ्या तरुणाला खडक पोलिसांकडून अटक करण्यात आली. या श्‍वानाची किंमत दोन लाख रुपये इतकी होती. त्याच्याकडून घरफोडी आणि चोरीचे सात गुन्हे उघड झाले आहेत. त्याच्याकडून यॉर्कशायर टेरिअर जातीचे श्वान, रोकड, दुचाकी असा अडीच लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.
अक्षय शंकर कांबळे (19 ,रा. हरकानगर, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार रोहित सातपुते (रा. कोथरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पसार झाला आहे.
यासंदर्भात सविस्तर असे की, फिर्यादी रोहित विलास निघोट (25 ,रा एनडीए रस्ता, खडकवासला ) यांचे कोथरूडमधील मयूर कॉलनी परिसरात नील पेट केअर हे श्वान विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी यॉर्कशायर टेरिअर या जातीचे श्वान काही दिवसांपूर्वी चोरले होते. या श्वानाची किंमत दीड ते दोन लाख रुपये एवढी आहे. दरम्यान, शुक्रवार पेठ भागातून दीपक लुटे यांची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी खडक पोलसीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास करताना घोरपडे पेठेतील कदम चौकात अक्षय कांबळे हा थांबला असून त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने दुकानाचे शटर उचकटून चोरी केल्याची माहिती पोलीस शिपाई रवी लोखंडे, अशिष चव्हाण यांना मिळाली.
पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने मयूर कॉलनीतील नील पेट केअर दुकानाचा दरवाजा उचकटून श्वान चोरल्याची कबुली दिली. शुक्रवार पेठ भागातून दुचाकी चोरी तसेच घरफोडी आणि चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहे. न्यायालयाने त्याला 19 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी शिर्के, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंत व्यवहारे, विजय लोखंडे, अनिकेत बाबर, इम्रान नदाफ, हिम्मत होळकर यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)