जम्मू – जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सकाळी 7.30च्या आसपास बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 35 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर 17 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना नजिकच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती स्थानीक अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींमध्ये बऱ्याच प्रवशांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळाली आहे.
ही मिनी बस केशवानहून किश्तवाडकडे जात होती आणि श्रीनगरीजवळ चालकाची गाडीवरील ताबा सुटल्याने बस खोल दरीत कोसळली. तर या बसमध्ये प्रमाणापेक्षा अधिक लोक बसल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. ही बस ओवरलोडेड झाली होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
किश्तवाडचे पोलीस आयुक्त अंग्रेज सिंह राणा यांनी सांगितले की, एक मेटाडोर वाहन केशवावहून किश्तवाडला जात होती. ही बस खोल दरीत कोसळली. दरम्यान या घटनेचा तपास सुरू केला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी या बाबतची माहिती कळवली. घटनास्थळावर पोहोचलेल्या मदत आणि बचाव कार्याच्या दलाने जखमींना तात्काळ रूग्णालयात दाखल केले. जखमींपैकी काहींचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या अपघातात बस चालकाचा ही मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.