20 जूनपासून अंमलबजावणी : संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
भुंग्यांना 300 रुपये किलो दर
ऊस पिकामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हुमणी किडीचे भुंगेरे गोळा करुन विभागीय कारखाना गट कार्यालयात जमा करावेत. सदर भुंग्यांना कारखान्यामार्फत प्रती किलो 300 रुपये दर दिला जाईल. जुलै 2019 अखेरपर्यंत हुमणीचे भुंगेरे गोळा करुन एकात्मिक कीड नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही उपाध्यक्ष बेंडे यांनी केले आहे.
पारगाव शिंगवे – आंबेगाव तालुक्यातील पारगाव-दत्तात्रयनगर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने लागवड हंगाम 2019-20 मधील ऊस लागवडीचे धोरण कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाहीर केले आहे. ऊस लागवड धोरणाची अंमलबजावणी गुरुवार (दि. 20) पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची ऊस लागवड धोरणासंदर्भात बैठक झाली. बैठकीमध्ये ऊस लागवडीच्या धोरणाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. आडसाली ऊस लागवडीसाठी 1 जुलै ते 30 ऑगस्ट 2019 पर्यंतच्या कालावधीमध्ये को. 86032, को. एम. 0265 व व्ही. एस. आय. 08005 या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. पूर्व हंगामी लागवडीसाठी 1 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर 2019 कालावधीमध्ये को. एम. 0265 व 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2010 कालावधीमध्ये को. 86032 व्ही. एस. आय. 08005 एम. एस. 10001 या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. तसेच 1 डिसेंबर 2019 ते मार्च 2020 अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये को. 86032, व्ही. एस. आय. 08005, एम. एस. 10001 या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती बेंडे यांनी दिली.
कारखाना कार्यक्षेत्र, परिसरातील सभासद व ऊस उत्पादकांना मागणीप्रमाणे 20 जून 2019 पासून वरील ऊस जातीचे बेणे वाटप करण्यात येणार आहेत. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा 7/12 उतारा संबंधित विभागीय शेतकी गट कार्यालयात देऊन बेणे मागणी नोंदवावी.
कारखान्यामार्फत उधारीने वसुलपात्र तत्वावर राबविणेत येणाऱ्या माती परीक्षण, ताग बियाणे, रासायनिक खते, द्रवरुप जीवाणू खते, ऊस रोपे, बायोकंपोष्ट, खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट कुट्टी सुविधा, लागवड व खोडवा उसामधील ठिबक सिंचन योजना व त्यासाठी एकरी 5000 रुपये अनुदान, व्ही.एस.आय.चे मल्टीमायक्रोन्युट्रीएंट, मल्टीमॅक्रोन्युट्रीएंट, वसंत उर्जा, जैविक किटकनाशक बी.व्ही.एम, ऊस पीक स्पर्धा इ. ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्हाईस चेअरमन बेंडे यांनी केले आहे.