35 ए बाबतची सुनावणी स्थगित

नवी दिल्ली – जम्मू काश्‍मीरातील नागरीकांना घटनेच्या कलम 35 ए अंतर्गत जे विशेषाधिकार देण्यात आले आहेत त्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत पण त्या याचिकांवरील सुनावणी न्यायालयाने स्थगित केली आहे. सध्या तीन न्यायाधिशांच्या खंडपीठापुढे या याचिकांची एकत्रित सुनावणी सुरू आहे. पण हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवावे काय यावर विचार करण्यासाठी सध्याच्या खंडपीठाने ही सुनावणी स्थगित ठेवली आहे.

न्या दीपक मिश्रा, न्या ए.एम.खानविलकर, आणि न्या. डी.वाय. चंद्रचुड यांच्या खंडपीठापुढे या याचिकांची सुनावणी सुरू आहे. तथापी आजच्या सुनावणीच्यावेळी न्या चंद्रचुड उपस्थित नव्हते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीच्यावेळी सरन्यायाधिश दीपक मिश्रा म्हणाले की घटनेचे कलम 35 ए हे घटनेच्या मुळ संकल्पनेला छेद देणारे आहे काय या मूलभूत मुद्याचा सर्वोच्च न्यायालयाला विचार करावा लागेल.

राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे 1954 साली घटनेत हे कलम समाविष्ठ करण्यात आले आहे. हा घटनात्मक तरतूदीला आव्हान देणारा विषय असल्याने त्याची सुनावणी घटनापीठापुढेच होणे गरजेच आहे असेही सरन्यायाधिशांनी सुनावणीच्यावेळी नमूद केले. त्यामुळे हे प्रकरण घटनापीठाकडे सोपावण्याच्या संबंधातील निर्णय तीन न्यायाधिशांच्या खंडपीठाकडून लवकरच घेतला जाईल असे आज कोर्टाने स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)