नायिकांची पावले विवाहवेदीकडे…

बॉलीवूडच्या चंदेरी नगरीतील नायिकांना प्रसिद्धीचं वलय आणि स्टारडम कितीही लाभत असलं तरी एक स्री म्हणून कुटुंबाची-संसाराची इच्छा प्रत्येकीच्याच मनात असते. मात्र विवाहानंतर करिअर कोमेजतं, मावळतं, मागं पडतं असं इथलं वास्तव आणि इतिहास सांगतो. त्यामुळंच आजवर बहुतांश नायिका-अभिनेत्री बॉलीवूडमध्ये स्थिरावूनही विवाहाच्या विचारांपासून दूर राहिल्या. आजच्या अभिनेत्री मात्र विवाहाबाबत स्पष्टपणाने बोलताना दिसत आहेत आणि त्यातून त्यांना वैवाहिक आयुष्य, कुटुंब यांबाबत अधिक ओढ असल्याचे दिसत आहे.

अमृता राव
दोन वर्षांपूर्वी 2016 मध्ये अमृता रावने रेडिओ जॉकी अनमोलशी विवाह केला. त्यानंतर तिने चित्रपट केलेले नाहीत. आता राजकुमार हिरानीच्या संजय दत्तच्या बायोपिकवर आधारित चित्रपटात ती एक छोटी भूमिका साकारत आहे. लग्नाबाबत विचारणा केली असता ती सांगते की लग्न करायचं हे मी खूप आधीच ठरवले होते. लग्नानंतर आयुष्य बदलले आहे. अर्थात ही काही नवी गोष्ट नाही. बहुतेक सर्वच मुली या बदलासाठी तयार असतात. अर्थात लग्नानंतर आपले आयुष्य बदलते. ते चांगल्या पद्धतीने जगता येत नाही ही विचारधाराच चुकीची आहे. माझ्याकडे जे काही काम येते ते मी करतेच आहे. आत्ता माझे आयुष्य एका वेगळ्या दिशेने मात्र योग्य वेगाने मार्गक्रमाण करत आहे.

विरुष्का अर्थात अनुष्का आणि विराटच्या लग्नानंतर बॉलीवूडमध्ये लग्न करण्याची चढाओढ सुरू झाली आहे. मुळातच अलीकडील काळात अभिनेत्री फक्‍त त्यांच्या कारकिर्दीविषयी बोलून लग्नाच्या मुद्यावर मात्र मौन बाळगत नाहीत. आता त्या बेधडकपणे या विषयाला सामोऱ्या जातात. काही दिवसांपूर्वी सुश्‍मिता सेन हिने लग्नाच्या प्रश्‍नाला उत्तर देताना स्पष्ट म्हटले की, ती आता लग्न करण्यास तयार आहे. दुसरीकडे अनेक नायिका अशा आहेत ज्या लग्नाचा मुद्दा टाळत नाहीत; मात्र कधी करणार याविषयी त्यांच्याकडे ठोस उत्तर नाही. दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, कंगना रनौत, यामी गौतम, श्रद्धा कपूर, इलियाना डिक्रूज, ईशा गुप्ता इत्यादी अभिनेत्री देखील कारकिर्दीच्या योग्य वळणावर त्या लग्नाचा विचार जरूर करणार असे सांगताहेत. एकुणातच आपल्याकडील अभिनेत्री आता घर संसार सांभाळण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.

-Ads-

श्रद्धा कपूरची इच्छा काय?
अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. त्याविषयी नव्याने काहीच सांगण्याची आवश्‍यकता नाही. “आशिकी 2′ चित्रपटाच्या वेळी त्यांच्या लग्नाची बातमी आली होती. लग्न तर झाले नव्हतेच पण श्रद्धा आदित्य आपला बेस्ट फ्रेंड असल्याचे सांगायला कचरत नव्हती. मध्यंतरी, वयाने मोठा असलेल्या फरहान अख्तरशी सूत जुळल्याचे सांगितले जात होते. सध्या श्रद्धा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. सध्या तिच्या हातात साहो, बत्ती गुल मीटर चालू सारखे मोठे चित्रपट आहेत. श्रद्धा आपल्या लग्नाविषयीचे प्रश्‍न टाळत नाही. मी माझ्या आईच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करेन असेही होऊ शकते. पण आत्ता तरी काहीच नक्‍की नाही असे ती काही दिवसांपूर्वी म्हणाली होती. पण ताज्या बातमीनुसार, श्रद्धा लवकरच आपला बॉयफ्रेंड अभिनेता फरहान अख्तर याच्यासोबत विवाहबद्ध होणार असून फरहान अख्तर याचा हा दुसरा विवाह असेल. फरहानने आपली पूर्व पत्नी अधुना हिच्यासोबत घटस्फोट घेतला असून 2000 साली फरहान आणि अधुना यांचे लग्न झाले होते आणि 24 एप्रिलला त्यांनी घटस्फोट घेतला होता. फरहान – अधुनाच्या घटस्फोटासाठी श्रद्धाच कारणीभूत असल्याचेही म्हटले जात आहे.

दीपिकाच्या लग्नाचा बार यंदाच
विजय मल्ल्यांचे चिरंजीव, रणबीर कपूर आणि रणवीर सिंग यांच्याशी नाव जोडली गेलेली दीपिका पदुकोण याच वर्षी लग्न करणार असे मानले जाते. मात्र हा विवाह नेमका कधी होणार याबाबत ना दीपिका स्पष्ट बोलते ना रणवीर सिंह स्पष्ट सांगतो. त्यांच्या जवळच्या काहींच्या मते, त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे आणि याच वर्षी ते विवाहबद्ध होतील.

कंगनाची योजना
कंगना राणावत स्पष्टच सांगते की ती आयुष्यभर चित्रपटांना चिकटून राहणार नाहीये. एका लोकप्रिय फिल्मी मॅगेझिनने तर “कंगनाचे आता तिचे वय झाले आहे आणि तिने आता लग्न करावे’ असे स्पष्टपणे म्हटले आहे. तिलाही ही गोष्ट मान्य आहेच. कंगना म्हणते, “मी उगाचच एका मोहजालात अडकून पडले होते. आता सर्व आलबेल आहे. लग्न तर करायचे आहेच. माझ्या बहिणीचे लग्न झाले आहे. मीही पुढच्या दोन वर्षात लग्न कऱण्याच्या विचारात आहे. अर्थात याविषयी मी कोणतीही घाई करणार नाही. या दरम्यान माझे काही महत्त्वाचे चित्रपट पूर्ण होणार आहेत. लग्नानंतर मी सर्व लक्ष दिग्दर्शनावर केंद्रित करणार आहे. मी 2019 ची एक तारिख ठरवली आहे तेव्हापर्यंत मी माझ्या लग्नाचा निर्णय पक्‍का करेन.’

प्रियांकालाही करायचे लग्न
बॉलीवूड चित्रपटांपासून लांब गेलेल्या प्रियांका चोप्राने तर स्पष्टपणे कबूल केले आहे की तिला आता एका जोडीदाराची गरज आहे. तिला योग्य पद्धतीने सांभाळून घेणारा आणि तिच्या कामाची पद्धत मान्य असणारा नवरा -जोडीदार प्रियांकाला हवा आहे. ती सांगते की मैत्रीच्या प्रकरणात मी अनेकदा भावी जोडीदाराचा शोध घेतला मात्र गोष्टी पूर्णत्वाला गेल्या नाहीत. त्याविषयी मी खोलात जाऊन काहीही सांगणार नाही. पण मला लग्न करायचे आहे. त्याविषयीचा निर्णय मी कधीही घेऊ शकते.

इलियानाचा गुपचूप विवाहाचा घाट
अशी चर्चा आहे की इलियाना डिक्रूजने अँड्य्रू निबोन या आपल्या ऑस्ट्रेलियन प्रियकराबरोबर बरोबर लग्न केले आहे; पण आपल्या खाजगी आयुष्याविषयी काहीही चर्चा करणार नसल्याचे इलियानाने ठणकावून सांगितले आहे. खाजगी आयुष्य गुप्त राखायचे आहे असेही ती सांगते. मात्र लग्नसंस्थेवर ही अभिनेत्री विश्‍वास ठेवते हे मात्र खरेच.

समारोप
ही सर्व माहिती लक्षात घेता, लग्न या विषयावर अभिनेत्रींची मते बदलल्याचे दिसते. पूर्वीप्रमाणे लग्न कधी या प्रश्‍नावर त्या गडबडून जात नाहीत. गेल्या काही वर्षात अभिनेत्रींचा लग्नासंबंधीच्या विचारात फरक पडल्याचे चित्रपट निर्मातेही सांगतात. आज त्या लग्नाचा विषय टाळत नाहीत. त्याविषयी बिनधास्त बोलतात. त्यांना लग्नानंतर आपल्या कारकिर्दीची पीछेहाट होईल याचीही भीती वाटत नाही. दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणतो की आता दिग्दर्शकही लग्न झालेली अभिनेत्री चित्रपटात घ्यायची नाही असा विचार करत नाहीत.

चांगली अभिनेत्री असेल तर सर्वच दिग्दर्शक तिला आपल्या चित्रपटात घेऊ इच्छितात. याबाबतीत काजोल आणि माधुरी दीक्षित यांचे उदाहरण घेऊ शकतो. जुन्या काळातही अशा अनेक लग्न झालेल्या अभिनेत्री काम करताना दिसतात. माधुरीविषयी सांगायचे तर तिने योग्य वेळी घर संसार थाटला. आता ती पुन्हा चित्रपटांमध्ये सक्रीय होते आहे. ती सांगते की लग्न कधी करायचे हा अभिनेत्रीचा स्वतःचा निर्णय असतो. लग्नानंतरच्या करिअरविषयी विचार करत बसणे चुकीचे ठरते. तुमचे अभिनयसामर्थ्य उत्तम असेल तर लग्नानंतरही तुम्हाला लोक स्वीकारतात. नव्या अभिनेत्रींनी बहुधा माधुरीचा सल्ला मनावर घेतलेला दिसतोय.

सोनम परब

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)