संगमनेरमध्ये राजरोज सुरू आहे मटका
पोलिसांचा आशिर्वाद; स्टिंग ऑपरेशनने पितळ पडले उघडे

नितीन शेळके

-Ads-

संगमनेर – शहर पोलिसांनी चार ठिकाणी छापे टाकून 24 तास उलटत नाही, तोच शहरातील अवैध धंदे पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याचे “प्रभात’ च्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले. या प्रकाराला थेट पोलिसांचा आशिर्वाद असल्याने शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बसस्थानक परिसरात मटक्‍याचे आकडे घेण्याचे काम राजरोस सुरूच होते.
मटका, जुगार, वाळू, अवैध वाहतूक, गांजाविक्रीसह सर्वच प्रकारचे अवैध धंदे येथे सुरू आहेत. पोलिसांच्या या व्यवसायावरील कारवायादेखील सातत्याने संशयाच्या गर्तेत अडकलेल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच्या कारवायादेखील याचाच एक भाग समजल्या जात आहेत. अवैध व्यवसायाबद्दल चर्चा सुरू झाल्या, की पोलीस तात्पुरती मलमपट्टी करतात. कारवाईचा फार्स केला जातो. मात्र, या कारवायांच्या वेळी थेट मुख्य मटका बुकी, जुगार अड्डे चालविणाऱ्यांसह सर्वंच प्रमुख नामानिराळे असतात. केवळ पंटरवर कारवाई होते. शहरातील दोन दिवसांपूर्वीची कारवाई दोन्ही बुकी व्यतिरिक्त तिसऱ्याच व्यक्तीशी संबंधित असल्याने कारवाईचे नाटक वठविण्यत आल्याचे स्पष्ट होते. पोलिसांनी केलेल्या अशा प्रकारच्या कारवाईनंतर पुढे काय तपास होतो, याचा कधीही उलगडा होत नाही. पुन्हा हे धंदे काही तासातच नव्या जोमाने सुरू होतात. शहरात सर्वंच ठिकाणी मटका आणि जुगाराचे अड्डे पावलोपावली सुरू आहेत. यातून मोठ्या प्रमाणात अर्थकारण होत असते. कोणत्याही हप्तेखोरीशिवाय हे धंदे राजरोस चालत नाहीत. केवळ शासकीय नव्हे, तर खासगी लोकदेखील यांचे लाभार्थी असतात. आजमितीस शहरात 80 पेक्षा अधिक मटक्‍यांचे अड्डे सुरू आहेत. या व्यवसायात दोन प्रमुख मटका किंग आहेत. दोघांमध्ये व्यावसायिक ठिकाणे वाटून घेण्यात आली आहेत. त्यांच्याकडे असलेल्या ठिकाणात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप झाला, की तातडीने कारवाई होते. या दोन्ही मटका व्यावसायिकांकडे शेकडो लोक नोकऱ्या करतात. अनेकांचे संसारदेखील याच मटका, जुगार व्यवसायावर अवलंबून आहेत. एकीकडे या मटका, जुगारातून अनेक संसार रस्त्यावर येत असले, तरी दुसरीकडे काहींचे संसारदेखील याच व्यवसायावर अवलंबून आहेत.
शेकडो लोक कमी श्रमात झटपट पैसे मिळविण्यासाठी जुगाराच्या पत्त्यांचा आणि आकड्यांचा खेळ खेळतात. याशिवाय या व्यवसायात इमानदारी असल्याने दुसऱ्या दिवशी निश्‍चितच पैसे हातात येतात. अनेक लोक दररोज या व्यवसायाला बळी पडत असल्याचे दिसते. शहरातील अवैध व्यवसाय थांबविण्याचे काम मुख्य:त पोलिसांचे आहे. परंतु, पोलिसांकडून या व्यवसायाचे कंबरडे मोडले असे कधीच झाले नाही. या व्यवसायाशी संबंधित अनेकांची पोलीस ठाण्यात उठबस असते.
मंदिराच्या पारावर मटका

शहरात सुरू असलेल्या मटका व्यवसायाचे प्रभात प्रतिनिधीने स्टिंग ऑपरेशन केले. या प्रतिनिधीनेदेखील सकाळीच बसस्थानकाबाहेरील दत्त मंदिराच्या पारावर सुरू असलेल्या मटका अड्ड्याला भेट दिली. राजरोस सुरू असलेल्या या मटका अड्डयावर प्रतिनिधीने 25 रुपये आणि 489 या आकड्यावर पंचवीस असा पन्नास रुपयांचा मटका लावला. त्यानंतर याची चिठ्ठीदेखील प्रतिनिधीला देण्यात आली. नवख्या माणसाचा कोणताही संशय मटक्‍याचे आकडे नोंदविणाऱ्या व्यक्तीला आला नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)