प्रणाम महावीरांच्या विचारांना

ज्या काळात समाजात वर्णभेद होता अशा काळात भगवान महावीरांनी सर्व धर्मासाठी तत्त्वज्ञान मांडलं. महावीरांनी पाच अणुव्रतं समाजासमोर मांडली. सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अचौर्य आणि ब्रह्मचर्य अशी ती अणुव्रतं होती. त्याचप्रमाणे त्यांनी त्या काळात पर्यावरणाविषयीही महत्त्वाचे विचार मांडले. पृथ्वी वाचवायची असेल तर महावीरांच्या विचारांचं आचरण करण्याची आवश्‍यकता आहे. हे विचार इतर अनेक राष्ट्रप्रमुखांनाही पटू लागले आहेत. महावीर जयंती हा भगवान महावीरांच्या विचारांना सलाम करण्याचा दिवस आहे.

समाजात आज अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. ते सोडवायचे असतील तर काय करता येईल, हे भगवान महावीर यांनी अनेक वर्षांपूर्वी सांगितलं होतं. यावर्षी भगवान महावीरांची जयंती साजरी होत आहे. हा महाउत्सव केवळ जैनांचा नाही. महावीरांच्या विचारांना सलाम करण्याचा हा दिवस आहे. महावीरांनी जे तत्त्वज्ञान मांडलं, दिशा दिली, उपदेश केला तो सर्व सजीवांना होता. जन्माने तुम्ही कोणत्याही धर्माचे असला तरी महावीरांच्या विचारांना प्रतिबंध नव्हता. त्यांचे विचार केवळ जैन समाजासाठीच होते असं नाही. प्रत्येक धर्मासाठी ते लागू होते. त्यांच्या विचारांमध्ये वर्णभेद, जातिभेद नव्हता. महावीरांच्या काळात समाजाची भयानक अवस्था होती. महावीरांच्या आधी जैनांचे 23 तीर्थंकर होऊन गेले. महावीर हे 24 वे तीर्थंकर.
महावीर पृथ्वीवर अवतरले त्या काळी येथे वर्णव्यवस्था होती.

स्त्रियांना कोणतेही अधिकार नव्हते. यज्ञामध्ये प्राण्यांची प्रचंड प्रमाणावर हिंसा होत होती. हजारो प्राण्यांना यज्ञामध्ये प्राण गमवावे लागत होते. त्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष होता. अशा काळात महावीरांनी आपलं तत्त्वज्ञान जगासमोर ठेवलं. महावीरांनी पाच अणुव्रतं समाजासमोर मांडली. सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अचौर्य आणि ब्रह्मचर्य अशी ती अणुव्रतं होती. ब्रह्मचर्याची व्याख्या व्यापक होती. एकपत्नीव्रत असा त्याचा अर्थ होता. या सगळ्या गोष्टींचा प्रचार आणि प्रचार महावीरांनी त्या काळात केला. त्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणावर क्रांती झाली. यामुळे इतर समाजातील अनेकांनी याचा अंगीकार केला आणि जैन धर्म स्वीकारला.

जैन धर्म ही एक जीवनशैली आहे. कसं जगावं याची नियमनं महावीरांनी सांगितली. या जीवनशैलीप्रमाणे जो जगतो तो जैन, अशी त्याची परिभाषा होती. महावीरांच्याच काळात गौतम बुद्ध अवतरले. महात्मा गांधीजींच्या जीवनावरही महावीरांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. महात्मा गांधी यांनी भारतात जी क्रांती घडवून आणली ती जैन धर्माची देणगीच म्हणावी लागेल. महात्मा गांधी श्रीमद्‌ राजचंद्र या जैन श्रावकाच्या सान्निध्यात आले. त्यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव महात्मा गांधीजींच्या जीवनावर झाला.

गांधीजींनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लॉर्ड रस्किन, टॉलस्टॉय आणि श्रीमद्‌ राजचंद्र या तीन व्यक्‍तींच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर होता असं त्यांनी लिहिलं आहे. श्रीमद्‌ राजचंद्र यांच्याकडूनच त्यांना महावीरांच्या विचारांची शिकवण मिळाली. महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा, अपरिग्रह, ब्रम्ह्मचर्य यांचे जे प्रयोग केले ती जैन धर्माची शिकवण आहे. पायी आणि अनवाणी पायाने चालायचं, या जैन धर्माच्या शिकवणीनुसार महात्मा गांधी दांडीयात्रा पायीच केली. गांधीजींच्या जीवनावर सत्य, अहिंसा या सर्व तत्त्वांचा प्रभाव होता. जैन धर्मामध्ये उपवासाला अत्यंत महत्त्व आहे. गांधीजींनी या उपवास सत्राचा उपयोग आपल्या जीवनात अनेकवेळा केला. जनकल्याणासाठी एखादी गोष्ट मिळवायची असेल तर ते उपवासाला बसत असत. जैन धर्माचे उपवास हे निरंकार असतात. पाणी, अन्न यांपैकी काहीही न घेता हे उपवास केले जातात, अशा प्रकारे हे महाव्रत केलं जातं. याचा प्रभाव महात्मा गांधी यांच्यावर होता.

भगवान महावीरांनी अहिंसेचे जे तत्त्वज्ञान 2600 वर्षांपूर्वी मांडले ते आज एकविसाव्या शतकातही तेवढेच महत्त्वाचे आहे. याचा उद्‌घोष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनीही केला. पृथ्वीला वाचवायचे असेल तर अहिंसेला पर्याय नाही, असा सूर आता सर्वच राष्ट्रांमधून उमटत आहे. पृथ्वी वाचवायची असेल तर सर्वच सजीवांची हिंसा रोखली पाहिजे, त्यांच्या कल्याणाचा आपण विचार केला पाहिजे. हे महान तत्त्वज्ञान भगवान महावीरांचं होते. आज एकविसाव्या शतकात त्याचा विचार झाला पाहिजे.

वर्तमानाला वर्धमानाची गरज आहे, असं मी नेहमी सांगत असतो. आज एकविसाव्या शतकात अहिंसा, शांतता या तत्त्वांचं पालन झालं तर मानव सुखी होऊ शकेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. भगवान महावीरांनी 2600 वर्षांपुर्वी पर्यावरणाचा विचार मांडला होता. पाणी, ऊर्जा यांचा वापर करताना विवेक जागृत ठेवा असं भगवान महावीरांनी सांगितलं होतं. प्रत्येक गोष्टीचा वापर करताना अशा प्रकारे विवेक जागृत ठेवला तर पर्यावरणाचं रक्षण आपोआप होईल. हे तत्त्वज्ञान पर्यावरणाचा महामंत्र आहे. आज चंगळवादी संस्कृतीमुळे आपण पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत, निसर्गाचं दोहन होत आहे, पृथ्वीचं शोषण केलं जात आहे.

या गोष्टींना महावीरांनी त्या काळात प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे जैन साधूदेखील कमीत कमी गोष्टी आपल्याजवळ ठेवतात. सर्व गोष्टींचा अपरिग्रह करतात. दिगंबर साधू पाण्याचा कमंडलू आपल्याजवळ ठेवतात. याच्याशिवाय त्यांच्याकडे काहीही नसतं. तरीही परमोच्च आनंदाची अवस्था ते अनुभवू शकतात.

भगवान महावीरांनी एका समाजाची स्थापना केली. या समाजातील स्त्री-पुरुषांना श्रावक-श्राविका म्हटलं जातं. साधू आणि साध्वी समाजाला दिशा देण्याचं काम करत असत. महावीरांचं तत्त्वज्ञान आज साऱ्या जगाला आकर्षित करत आहे. यामागे विचारांची शृंखला आहे. आज संपूर्ण जगात “जैनॉलॉजी’चा अभ्यास करणारे अनेक विचारवंत आहेत. पृथ्वीला केवळ जैन जीवनशैलीच वाचवू शकेल, असा विश्‍वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला आहे. लॉर्ड बर्नाड शॉ या आयरिश तत्त्वचिंतकाने आपल्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे.

मला जर पुनर्जन्म घ्यावा असं वाटलं तर तो मी भारतात घेईन आणि कोणत्या धर्मात जन्म व्हावा असं कोणी विचारलंच तर मी जैन धर्माचाच स्वीकार करेन, असं तो म्हणतो. आईन्स्टाईन हाही जैन धर्माचा अभ्यासक होता. आज समाजात अनेक प्रश्‍न ठाण मांडून बसले असताना ते हटवण्यासाठी महावीरांच्या विचारांचं चिंतन, मनन आणि आचरण करण्याची आवश्‍यकता आहे.

डॉ. कल्याण गंगवाल
जैन धर्माचे गाढे अभ्यासक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)