चाळिशी

  अबाऊट टर्न – हिमांशू 

वयानं चाळिशी गाठली की डोळ्यांवर चष्मा येतो आणि तापमानानं चाळिशी गाठली की डोळ्यांवर गॉगल येतो. सध्या गॉगलचे दिवस सुरू झालेत. परंतु तापमानसुद्धा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसारखं चेंडू कुरतडून यॉर्कर टाकतंय की काय कळेना! पुण्यात 38.1 अंशांवर पारा पोहोचला त्याच्या दोनच दिवस आधी पुण्यापासून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या महाबळेश्‍वरमध्ये दवबिंदू गोठले. तिथलं तापमान अचानक 10 अंशांपर्यंत घसरत असताना जवळपासच्याच इलाख्यांमध्ये पारा चढत चाललाय, हे बघून निसर्गाच्या मनात नेमकं काय आहे, हेच कळेना! मध्यंतरी मराठवाड्यात अचानक मोठी गारपीट झाली. त्यानंतर मध्येच कुठेतरी अवकाळी पाऊस पडून गेला.

मुंबई, कोकणावर ढग दाटून आले आणि आता अंगाची लाही-लाही करणारा हा तीव्र उन्हाळा. अवघ्या महिन्याभराच्या कालावधीत झालेले हवामानातले चढउतार पाहिले, तरी निसर्गाचा लहरीपणा किती वाढलाय याची कल्पना येते. उन्हाळा म्हटलं की पंखे, एसी, कूलर, कलिंगड, बर्फाचे रंगीत गोळे, आईस्क्रीम, वीकेन्डला वॉटर पार्कची सहल आणि अचानक थंडी पडलीच तर पहाटेच्या धुक्‍यात शाली लपेटून फिरायला जाणं एवढाच ऋतूबदलाचा अर्थ आमच्यासारख्या शहरी लोकांना ठाऊक असतो. हा बदल अचानक झालेला असला, तरी त्याला दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया एवढ्याच असतात. शहरात प्रदूषण वाढलं तरी चेहरा झाकायला स्कार्फ आणि नाकाला लावायला मास्क असतो. अचानक पाऊस कोसळला, तरी जोपर्यंत पाणी साचून राहात नाही, तोपर्यंत घरी जाण्यासाठी वाहतुकीची साधनं उपलब्ध असतात.

खेड्यात, शेतशिवारात जेव्हा अवकाळी पाऊस कोसळतो, तेव्हा त्याचा अर्थ असतो वर्षभराच्या घामावर पडलेलं पाणी. खळ्यात मळणी सुरू असताना अचानक ढग दाटून गडगडाट सुरू झाला, की पहिली वीज चमकते ती शेतकऱ्याच्या काळजात. कापणी केलेलं पीक शेतातच भिजतं. कवडीमोलाचं राहत नाही. मदतीची याचना करण्याशिवाय हातात काहीच उरत नाही. तापमानवाढीच्या परिणामांपासून शहरंही फार लांब आहेत असं नाही. तापमानात प्रदूषणाची भर पडल्यामुळं संकट वाढतच आहे. कोंडलेला श्‍वास मोकळा करण्यासाठी ऑक्‍सिजन बार सुरू झालेत. मेट्रो आणि हायपरलूप आणून आपण वेग वाढवतो आहोत. प्रगतीचा आणि ऱ्हासाचाही.

कारण मेट्रोसाठी तुटणाऱ्या झाडांबद्दल आपल्याला काहीच सोयरसुतक उरलेलं नाही. इलेक्‍ट्रॉनिक क्रांतीचे ढोल जरूर वाजवू आपण; परंतु देशभरात दरवर्षी जमा होणाऱ्या 18 लाख टन इलेक्‍ट्रॉनिक कचऱ्याचं करायचं काय, हेही एकदा ठरवायला हवंच ना? इलेक्‍ट्रॉनिक कचऱ्यातली घातक रसायनं असतात आणि 25 टक्‍के इलेक्‍ट्रॉनिक कचराही रिसायकल होऊ शकत नाही. देशभरात वाढत चाललेल्या मोबाइलचं आयुष्य ठरलेलं असतं. नवनवीन मॉडेल्स येतात; पण जुन्याचं काय करायचं?

भल्या सकाळी ओंजळीतून अर्घ्य दिलानं सूर्यनारायणाचा प्रकोप थांबणार नाही. ऐन मार्च महिन्यात उष्णतेची लाट आपल्याला होरपळून काढत असेल, तर पुढच्या दोन महिन्यांच्या धास्तीनं आपणच जागं व्हायला पाहिजे. अशा तप्त वातावरणात मोर्चे-प्रतिमोर्चे आणि भडक राजकीय वक्‍तव्यांवर चर्चा करून मेंदूचं तापमान आणखी वाढवण्याऐवजी आता एकच प्रश्‍न आपल्याला पडायला हवा. विकास हा शब्द (व्याख्येविना) सर्वच पक्षांच्या अजेंड्यावर आहे. पण आपल्या अस्तित्वालाच आव्हान देऊ पाहणारा लहरी निसर्गाचा मुद्दा कुणाच्या अजेंड्यावर आहे की नाहीच?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)