“दूरशिक्षणा’चे दालन होणार खुले!

व्यंकटेश भोळा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दूरशिक्षण अभ्यासक्रम गेल्या अनेक वर्षापासून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेअभावी रखडला होता. आता विद्यापीठाला स्वायत्ततेचा दर्जा मिळाल्याने दूरशिक्षण अभ्यासक्रमाला गती मिळणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाकडून दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

विद्यापीठाने दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी यापूर्वीच विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (युजीसी) मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला होता. गेल्याच महिन्याच त्रुटीची पूर्तता करून पुन्हा प्रस्ताव युजीसीकडे पाठविण्यात आला. त्यानंतर अद्यापही युजीसीची मान्यता मिळत नव्हती. परिणामी, विद्यापीठाला दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करता येत नव्हती. त्यामुळे विद्यापीठाचे दूरशिक्षण अभ्यासक्रम गेल्या अनेक वर्षापासून भिजत घोंगडे राहिले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला स्वायतत्ता दर्जा देण्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी केली. स्वायत्तता दर्जा मिळाल्याने विद्यापीठाला युजीसीकडे विविध परवानग्या आणि मान्यतेच्या जंजाळातून सुटका होऊन नवे अभ्यासक्रम सुरू करणे शक्‍य झाले आहे. आता विद्यापीठाला दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यास युजीसीची मान्यता लागणार नाही. हा निर्णय जाहीर होताच विद्यापीठाने दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

दरम्यान, शिक्षण हे वर्गापुरते मर्यादित नसून, ऑनलाईन व ई-लर्निंगच्या माध्यमातून जगामध्ये शिक्षण देण्याच्या पद्धतीवर भर देण्यात येत आहे. नोकरी करणाऱ्या, अन्य काही अडचणी असणाऱ्या विद्यार्थ्यांना सहजपणे शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी विद्यापीठाने “मुक्‍त अध्ययन संकुल’ निर्माण केले आहे. भविष्यातील निकड लक्षात घेऊन विद्यापीठाने मुक्‍त अध्ययन संकुलाच्या अंतर्गत दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी दि. 18 मार्च रोजी सादर केलेल्या विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात 3 कोटी 40 लाखांची तरतूदही केली आहे. दूरशिक्षणसाठी विद्यापीठाने यापूर्वीच सर्व नियोजन केल्याने व स्वायत्तता दर्जा मिळाल्याने दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विद्यापीठाचे शिक्षणशास्त्र विभागप्रमुख व “मुक्‍त अध्ययन संकुल’चे संचालक डॉ. संजीव सोनवणे म्हणाले, विद्यापीठाचे दूरशिक्षण अभ्यासक्रम हे देशातील नाविन्यपूर्ण मॉडेल असेल. यास तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे. केवळ दूरशिक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन “लेक्‍चर’ उपलब्ध करून दिले जातील. तसेच विद्यार्थ्यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केलेले “स्वयम’ची लिंक विद्यार्थ्यांना खुली करून दिले जाईल. या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्रपणे पोर्टल विकसित करण्यात येत आहे.

दूरशिक्षण अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये
* अभ्यास साहित्य उपलब्ध होणार
* दूरशिक्षण केंद्रावर विशेष मार्गदर्शन
* विद्यार्थ्यांचे शंकेचे निरसन
* तज्ज्ञांची ऑनलाईन”व्याख्यान’ची सुविधा

स्वायत्तता दर्जामुळे “युजीसी’ची मान्यता न घेता विद्यापीठस्तरावर दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यास गती मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात बीए, बीकॉम, एमए व एमकॉम अभ्यासक्रम दूरशिक्षणाद्वारे सुरू करता येईल. त्यासाठी दूरशिक्षण केंद्राची निर्मिती केली जाईल. सध्या अभ्यास साहित्य निर्मितीची कार्यवाही विद्यापीठाने सुरू केली असून, दूरशिक्षण अभ्यासक्रमाने उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढेल.
डॉ. संजीव सोनवणे, संचालक मुक्‍त अध्ययन संकुल, शिक्षणशास्त्र विभागप्रमुख

“स्वायत्तता दर्जा मिळाल्याने जेवढ शक्‍य होईल, तेवढे चांगले अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न राहील. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला व अद्ययावत तंत्रज्ञानाशी जोडून नाविन्यपूर्ण दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. दूरशिक्षण अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू केले जाणार आहे.’
डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, पुणे विद्यापीठ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)