पुणे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक 311 कोटींचे

जिल्हा परिषदेची उद्या सर्वसाधारण सभा : अंदाजपत्रक मांडणार

पुणे – लोकसभेच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेच्या यंदाच्या (2019-20) मूळ अंदाजपत्रकाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीने मंजुरी देण्यात आली. यावर्षी अंदाजपत्रक साधारण 311 कोटी रुपयांचे आहे. गतवर्षी मूळ अंदाजपत्रक 320 कोटी होते. मात्र, विविध माध्यमातून जिल्हा परिषदेला येणाऱ्या उत्पन्नाला कात्री लागल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अंदाजपत्रकाची रक्कम कमी झाली आहे.

गतवर्षी (2018-19) मध्ये अंतिम अंदाजपत्रक 369 कोटी 70 लाख रूपयांचे होते. त्यामध्ये पंचायत विभागाचा पसारा मोठा असल्यामुळे या विभागाला गतवर्षी तब्बल 151 कोटी 44 लाख रुपये निधी देण्यात आला होता. तर अन्य विभागालाही निधीचे वाटप होते. परंतु यावर्षी प्रत्येक विभागाच्या निधी कमी करण्यात आला आहे. यावर्षी पंचायत विभागाच्या निधीमध्ये 8 ते 10 कोटी रुपये कमी होण्याची शक्‍यता आहे. शिक्षण विभागाला 26 कोटी 94 लाख रूपये मंजूर होते. यावर्षी त्यामध्ये 4 ते 5 कोटी कमी होतील. यासह आरोग्य, कृषी, पशूसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागालाही यंदा 2 ते 4 कोटी रूपये कमी मिळणार आहे. त्यामुळे त्या निधीमध्येच विकासकामे, योजना राबविणे आणि तेही पदाधिकारी आणि सदस्यांची मने राखून ही कामे करणे अधिकाऱ्यांसमोर आव्हान असणार आहे.
2019-20 चे अंदाजपत्रक मांडणार

लोकसभेची आदर्श आचारसंहिता संपल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून थांबलेल्या निर्णय प्रक्रियेला आता गती मिळेल. त्यामुळे विकासकांमेही मार्गी लागणार आहेत. याच्या नियोजनासाठी जिल्हा परिषदेने लागलीच मंगळवारी (दि. 28) सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. या सभेमध्ये 2019-20 चे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक मांडण्यात येणार आहे. यंदाचे अंदाजपत्र साधारण 311 कोटी रूपयांचे आहे. त्यामुळे कोणाच्या वाट्याला किती निधी येणार, समाधानी कोण आणि असमाधानी यांचे पडसाद या सर्वसाधारण सभेत उमटणार हे नक्की. दरम्यान, सर्वसाधारण सभेत या सर्व प्रश्‍नांचे पडसाद उमटणार असून प्रशासनाने या अधीच विकासकामांची पूर्वतयारी केली असेल तर ठीक, अन्यथा सदस्य आणि अधिकारी यांची खंडाजंगी होण्याची शक्‍यता आहे. कारण आचारसंहिता लागण्यापूर्वीच सदस्य शरद बुट्टेपाटील, रणजीत शिवतरे, वीरधवल जगदाळे, प्रमोद काकडे यांनी विधानसभेच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेला कामे करण्यास कमी कालावधी आहे. त्यामुळे अधीपासून पूर्वतयारी असावी, असे सूचित केले होते. त्यामुळे या वर्षातील पहिलीच सभा कोणत्या मुद्दयावरून गाजणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)