31 वर्षांनंतर भेटीने शिक्षक, विद्यार्थी गहिवरले

आश्‍वीत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

संगमनेर – तालुक्‍यातील आश्‍वी खुर्द येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील 1985-86 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनात 31 वर्षांनंतरच्या भेटीत बालपणीच्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थी, शिक्षकांना गहिवरून आले होते.

विद्यालयाचे माजी विद्यार्थी व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत ज्युनिअर इंजिनिअर पदावर कार्यरत असलेले शैलेश कुलकर्णी यांनी पुढाकार घेत या मेळाव्याचे आयोजन केले होते. आपल्या शिक्षकांची भेट घेत त्यांनी दिलेल्या ज्ञानदानाच्या ऋणाची कृतज्ञता व्यक्‍त केल्यामुळे शिक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. कुलकर्णी यांनी बऱ्याच दिवसांपासून या संमेलनासाठी प्रयत्न केले. 1985-86 च्या माजी विद्यार्थ्यांची यादी मिळवत विद्यार्थी मित्रांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

शिबलापूरचे माजी सरपंच शिवाजी डोंगरे, गंगा म्हस्के यांच्या मदतीने सर्व माजी विद्यार्थ्यांचे फोन नंबर मिळवून सोशल मीडियाच्या माध्यमातून संमेलनाची कल्पना त्यांच्यापुढे मांडत आश्‍वीत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य एस. के. मुसमाडे होते. यावेळी प्राचार्य तांबे, के. के. गुंजाळ, जी. जी. मुसमाडे, व्ही. एस. मुळे, सी. डी. केकाण, भागवत पाटील, उद्योजक किशोर जगताप, ग्रामसेवक रफीक सय्यद, शिवाजी डोंगरे, गंगा म्हस्के, पांडुरंग सांगळे, राजेंद्र सोनवणे, सुरेश भडकवाड, मैनाबाई क्षीरसागर, संजीवनी मांढरे, कमल गव्हाणे, लता आव्हाड, संगीता सोनवणे, गोकुळ घुगे, पांडुरंग घुगे, कादर सय्यद, दत्तात्रय यादव, किसन नागरे, आदींसह माजी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आई-वडील, शिक्षकांना विसरू नका

विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी त्याने आई-वडील व शिक्षकांना विसरू नये. शिक्षक व विद्यार्थी बऱ्याच वर्षांनंतर एकत्र आल्यामुळे जो आनंद मला मिळाला तो सदैव स्मरणात राहील. माझे जे आदरातिथ्य सन्मान झाला त्यामुळे मी शिक्षक असल्याचा अभिमान वाटतो. भविष्यात असे उपक्रम विद्यार्थ्यांनी राबवावे, असे आवाहन माजी प्राचार्य एस. के. मुसमाडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)