30 जूनला मध्यरात्री होणार जीएसटीचे लोकार्पण

सेंट्रल हॉलमधील विशेष कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली : संपूर्ण देशाला एकाच कर प्रणालीत बांधणाऱ्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीचे लोकार्पण येत्या 30 जूनला रात्री 12 वाजता होणार आहे. सेंट्रल हॉलमध्ये होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते जीएसटीचे लोकार्पण केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाबाबत माहिती दिली. 1 जुलैपासून देशात नवी कर प्रणाली लागू होणार आहे. जीएसटी लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांनाही निमंत्रण देण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय सर्व खासदार आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि विरोधी पक्ष नेतेही कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत. जीएसटीचा विकासदरावर चांगला परिणाम होईल. जम्मू आणि काश्‍मीरासाठी प्रक्रिया सुरु आहे. सगळे निर्णय सर्वानुमते घेण्यात आले असल्याची माहिती अरुण जेटलींनी यावेळी दिली.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा कायदा लागू करण्यासाठी मध्यरात्री संसदेचे विशेष सत्र बोलावण्यात येणार आहे. 1 जुलैला आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जीएसटी लागू होण्याशिवाय इतर घोषणाही केल्या जाऊ शकतात. जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर हा संपूर्ण देशभरात लागू केला जाणार असून, व्हॅटसह इतर सर्व कर रद्द होणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या करप्रणालींना पर्याय म्हणून जीएसटीकडे पाहिलं जात आहे. जीएसटी ही भारतातील सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे. या करप्रणालीमुळे करचुकव्यांना चाप बसणार असून राज्य सरकार तसेच सर्वसामान्यांना यामुळे कोणताही त्रास होणार नाही. या करप्रणालीमुळे सेंट्रल सेल्स टॅक्‍स, सेवा कर, एक्‍साइज टॅक्‍स, लक्‍झरी टॅक्‍स, मनोरंजन कर, व्हॅटसारखे सर्व कर रद्द होणार आहेत. ही करप्रणाली लागू झाल्यानंतर केंद्र आणि राज्यसरकारला यातील समान वाटा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)