295 बेशिस्त वाहनचालकांना सव्वाचार लाखांचा दंड

पीएमसी कायद्यानुसार कारवाई


गेल्या दहा दिवसांपासून कारवाईचा वेग वाढला


बेशीस्त वाहनचालकांना जरब बसविण्यासाठी प्रयत्न

पुणे – शहरातील बेशीस्त वाहनचालकांना जरब बसविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पीएमसी कायद्याचा आधार घेत कारवाईस सुरुवात केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून या कारवाईचा वेग वाढवण्यात आला असून 295 बेशिस्तांना वाढीव दंड लावण्यात आला आहे. त्यांच्याकडून 4 लाख 12 हजार दंडाची रक्‍कम वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.

शहरातील मुख्य रस्त्यांवर नो पार्किंग, फुटपाथ, नो एंट्रीतून जाणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईत बदल केला आहे. अशा बेशिस्तांवर कारवाईसाठी मोटार वाहन कायद्याऐवजी महापालिका (पीएमसी) ऍक्‍टचा वापर केला जात आहे. पीएमसी कायद्यानुसार दुचाकीला पाचपटीने, तर चारचाकीला होणारा दंड दहापटीने वाढला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून संयुक्तपणे “नो ट्रॅफिक रुल व्हायलोशन झोन’ तयार करण्यात आले असून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. 19 तारखेपासून ही मोहीम तीव्र करण्यात आली असून कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 295 जणांवर पीएमसी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. शहरातील सर्व विभागांत मिळून ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 4 लाख 12 हजार एवढा दंड वसूल केला आहे. यामध्ये प्रामुख्याने नो पार्किंग, नो एंट्री, फुटपाथवरील वाहने आदींचा समावेश आहे. पीएमसी कायद्यानुसार नो पार्किंगमधील दुचाकीला 1 हजार, तर चारचाकीला दोन हजार दंड लावण्यात येत आहे. मोटार वाहन कायद्यानुसार हाच दंड 200 रुपये होता. मात्र, यामुळे बेशिस्तांना फरक पडत नसल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी महापालिका कायद्यानुसार कारवाई सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)