नाशिक – नाशिकच्या गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’च्या (कॅट्स) वैमानिकांचा दीक्षांत सोहळा शनिवारी (दि. 11) लष्करी थाटात पार पडला. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी स्कूल आॅफ आर्टीलरी, देवळालीचे लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सलारीया होते.
भारतीय सैन्यादलाचा कणा मानल्या जाणाऱ्या ‘कॅट्स’च्या तळावरून लढाऊ वैमानिकांच्या ३१ व्या तुकडीचे 28 वैमानिक तसेच 6 प्रशिक्षक देशसेवेत दाखल झाले.
या वैमानिक व प्रशिक्षकांना दिमाखदार सोहळ्यात ‘एव्हिएशन विंग’ व ‘एव्हिएशन इन्स्ट्रक्टर बॅज’ प्रदान करण्यात आले. केंद्राने आपल्या प्रशिक्षण कालावधीचे ३२ वर्षे पूर्ण केले असून ३३व्या वर्षात पदार्पण केले आहेत.
युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे, शत्रूवर हवाई हल्ला करणे, भुदलाला रसद पुरविणे, जखमींना सुरक्षितपणे उपचारार्थ तत्काळ हलविणे आदी बाबींचे शास्त्रशुद्ध सैनिकी लढाऊ हेलिकॉप्टर चालनाचे प्रशिक्षण या केंद्रातून प्रशिक्षणार्थींना देण्यात येते.