कलंदर: 28 फेब्रुवारी…

उत्तम पिंगळे

28 फेब्रुवारीला तोंड पाडून बसलेला पाहून 1 फेब्रुवारी भेटायला आला.
1 फेब्रुवारी : काय बाबा, आज तुझा वाढदिवस आणि तू असा चक्क गुपचूप बसलेला आहेस?
28 फेब्रुवारी : अरे, तू मला बोलतोस म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.
1 फेब्रुवारी : मी काय केले आहे?
28 फेब्रुवारी : अरे आजचा दिवस भारतात आर्थिक जगतात महत्त्वाचा मानला जायचा. ब्रिटिश काळापासून आज भारताचे बजेट मांडले जायचे व लोक सकाळपासून रेडिओ-टीव्हीवर आर्थिक बाजाराचा कानोसा घ्यायचे.आता तूच सारे ते उपभोगत आहेस. वर मला विचारतोस की मी तोंड पाडून का बसला म्हणून? अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज असावी.
1 फेब्रुवारी : त्यात माझा काय दोष? सरकारनेच ठरवले ना ब्रिटिशकालीन प्रथेपासून फारकत घ्यायची?
28 फेब्रुवारी : पूर्वी तर बजेट सायंकाळी पाच वाजता मांडायचे कारण इंग्लंडमध्ये तेव्हा साडेअकरा वाजायचे. वर्ष 2011 ला प्रथम बजेट सकाळी 11 वाजता मांडले गेले त्याच वेळी माझ्या काळजात धस्स झाले की आता यापुढे आणखी काय काय होणार? आणि झालेही तसेच 2017 ला माझा तो मान काढला जाऊन तुला तो दिला गेला. त्यामुळे आता वित्तीय संस्था, बॅंका, शेअरबाजार व सर्वसामान्यांचे लक्षही माझ्याकडून तुझ्याकडे गेले. मी आता बिनकामाचा राहिलो आहे. पूर्वीचे दिवस आठवले म्हणून निराश झालो आहे.
1 फेब्रुवारी : आता ते माझ्या वाढदिवशी सादर करत असल्याने पुढे अंमलबजावणीसाठी दोन महिने मिळतात विधेयकावर चर्चा होते व मंजुरीसाठीही जास्त वेळ मिळतो.
28 फेब्रुवारी : म्हणजे जे काम पूर्वी एक महिन्यात होत होते त्याला दोन महिने मिळत आहेत, लोकप्रतिनिधींनाही तुम्ही आळशी बनवत आहात.
1 फेब्रुवारी : साधक-बाधक चर्चेमुळे चांगला वेळ मिळता. लोकांना आगामी वर्षांचे कर नियोजन करता येते.
28 फेब्रुवारी : पण तज्ज्ञ म्हणतात की माझ्या वेळी बजेटसाठी चांगला नऊ ते दहा महिन्यांचा डेटा मिळत होता त्यामुळे पुढच्या जमा खर्चासाठी योग्य माहिती मिळत होती. आता तुझ्या दिवशी बजेट होत असल्यामुळे एक महिन्याचा डेटा कमी मिळत असल्यामुळे त्रुटी जास्त असण्याची शक्‍यता असते. त्यामुळे पुढचे अंदाजही अचूक असण्याची शक्‍यता कमी असते. म्हणून माझ्या दिवसाचे बजेट जास्त अचूक होते. आज आता बजेट नसल्यामुळे मी साधा दिवस राहिलो आहे पण तुला शुभेच्छा! आता तुझ्या दिवसाचे हे तिसरे बजेट झाले. आजच्या दिवशी हा सन्नाटा पाहून मन विषण्ण झाले. काय ती गजबज, काय ते मार्केट, त्या शेअर्सची चढउतार, ते अर्थतज्ज्ञ.
1 फेब्रुवारी : ठीक आहे पण तुझी आठवण सारे छापील वर्तमानपत्रे काढत असतात त्याचे काय?
28 फेब्रुवारी : ते कसे काय?
1 फेब्रुवारी : म्हणजे बघ उद्या एक मार्च, सर्व वर्तमानपत्रांना तो फॉर्म छापावा लागतो. प्रेस एन्ड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्‍स्‌ 1867 अनुसरून. त्यात वृत्तपत्रांचा परिचय, प्रकाशनाचे ठिकाण, प्रकाशनाचा कालावधी, मालकी वगैरे असते. दर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवसानंतर छापल्या जाणाऱ्या पहिल्या छापील आवृत्तीमध्ये छापणे अनिवार्य असते.त्यामुळे देशातील सर्व वृत्तपत्रे तुला कायम लक्षात ठेवतात. आजच्या दिवशी उद्यासाठी ते छापण्यात मग्न असतात. त्या छापील पत्रावर तसा तुझा तसा उल्लेख करतात म्हणजे तारीख नसली तरी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसानंतर छापणाऱ्या पहिल्या आवृत्तीसाठी. नमुना क्र 1 नियम 3 नुसार दरवर्षी छापत असतात. त्यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभास तू कायमच लक्षात असतोस.
हास पाहू आता जरा!!!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)