विशेष मोहीमेत 270 वाहनांची तपासणी

आरटीओतील अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका : न्यायालयाच्या निर्देशानुसार तपासणीचे आदेश
 
पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून राबवण्यात आलेल्या विशेष वाहन तपासणी मोहीमेत केवळ 270 वाहनांची तपासणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. शहरातील वाहनांची संख्या पाहाता तपासण्यात आलेली वाहने अत्यल्प आहेत. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी लाखो वाहनांची जबाबदारी अवघ्या दोन मोटार निरीक्षकांच्या पथकावर सोपवण्यात आली होती. यामुळे वाहन तपासणीवर मर्यादा येऊन अपुऱ्या मनुष्यबळाचा सर्वाधिक फटका मोहीमेला बसल्याचे समोर आले आहे.

योग्यता प्रमाणपत्रासाठी आलेल्या वाहनांची काटेकोटपणे तपासणी होत नसल्याचे समोर आले होते. या पार्श्‍वभूमीवर परिवहन विभागातील राज्यातील तब्बल 37 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. याचवेळी न्यायालयाच्या निर्देशानुसार 8 ते 23 ऑक्‍टोबर दरम्यान राज्यभर वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसार योग्यता प्रमाणपत्र नसलेली तसेच योग्यता प्रमाणपत्र असूनही रस्त्यावर चालण्यास धोकादायक वाहनांची तपासणी मोहीम आरटीओकडून राबवण्यात आली. यासाठी दोन वाहन निरीक्षकांचा समावेश असलेले एक पथक तयार करून त्यांचावर या वाहनांची तपासणी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे जिल्ह्यात सर्वप्रकारच्या एकूण वाहनांची संख्या 37 लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामध्ये दुचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. मोहिमेंतर्गत प्रामुख्याने माल व प्रवासी वाहनांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील या वाहनांची संख्या विचारात घेता त्यांच्या तपासणीसाठी अधिक पथकांची आवश्‍यकता होती. मात्र, मनुष्यबळाअभावी केवळ एकच पथक नेमण्यात आले होते. या पथकांकडून दैनंदिन कामकाज करून उर्वरीत वेळेत संपूर्ण शहरात फिरून रस्त्यावर धावण्यास योग्य नसलेल्या वाहनांचा शोध घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. पथकाकडून पंधरा दिवसांत 270 वाहने तपासून यात दोषी आढळलेली 161 वाहने अटकावून ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, आरटीओतील मनुष्यबळाअभावी मोहीमेत आवश्‍यक ती तपासणी झाली नसल्याचे दिसून येत आहे.

 

विशेष तपासणीसाठी दोन जणांचे पथक स्थापन करण्यात आले होते. दिवे येथील टेस्ट ट्रॅक, दैनंदिन परवानाचे काम आदींसाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याने दोघांचे पथक स्थापन्यात आले होते. या पथकाकडून वाहन तपासणीसाठी आवश्‍यक ते प्रयत्न करण्यात आले असून रात्रीही वाहनांची तपासणी करण्यात आली.

– बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)