268 महाविद्यालयांची “नॅक’ मूल्यांकनाकडे पाठ

विद्यापीठाला कारवाईसाठी मुहूर्तच सापडेना : महाविद्यालयांना मिळणार नोटीस

पुणे – पुणे विभागात एकूण 463 अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. यातील तब्बल 268 महाविद्यालयांनी अद्याप एकदाही राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती समितीकडून (नॅक) मूल्यांकन करुन घेतलेच नाही. या महाविद्यालयांना “नॅक’ मूल्यांकन करुन घेण्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने वारंवार “स्मरणपत्र’ पाठविली आहेत. मात्र, अद्यापही या महाविद्यालयांनी “नॅक’ मूल्यांकनाकडे पाठ फिरविली आहे. या महाविद्यालयांवर कारवाई करण्यासाठी विद्यापीठाला मुहूर्तही सापडेनासा झालेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती समितीकडून (नॅक) मूल्यांकन करुन घेण्याची सक्ती विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेली आहे. मात्र, बहुसंख्य महाविद्यालयांनी अद्यापही त्याची गांभीर्याने दखल घेतल्याचे आढळत नाही. एकदाही “नॅक’ मूल्यांकन न झालेल्या महाविद्यालयांची संख्याही जास्त असल्याचे पहायला मिळते. पुणे विभागात प्रामुख्याने पुणे शहर व ग्रामीण भाग, अहमदनगर, नाशिक या भागातील महाविद्यालयांचा समावेश होतो.

पुणे विभागात एकूण 463 महाविद्यालये आहेत. यातील एकूण केवळ 195 महाविद्यालयाचे एकदाच “नॅक’ मूल्यांकन झालेले आहे तर, 268 महाविद्यालयांचे “नॅक’ मूल्यांकनच झालेले नाही. “नॅक’ मूल्यांकन करुन घेण्यात अनुदानित महाविद्यालये मात्र अग्रेसर आहेत. अनुदानित महाविद्यालयांचा विचार करता 167 पैकी 163 महाविद्यालयांचे “नॅक’ मूल्यांकन झाले आहे. अद्याप यातील केवळ 4 महाविद्यालयांचे “नॅक’ झालेले नाही. विनाअनुदानित महाविद्यालयांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. आता विभागात तब्बल 296 विनाअनुदानित महाविद्यालये कार्यरत आहेत. यातील केवळ 32 विनाअनुदानित महाविद्यालयानींच “नॅक’ मूल्यांकन करुन घेतले आहे. आणखी 263 महाविद्यालये “नॅक’ मूल्यांकनापासून दूर राहिलेली आहेत.

विभागातल्या सर्वच महाविद्यालयांनी “नॅक’ मूल्यांकन करुन घेणे बंधनकारक आहे. “नॅक’ न झालेल्या महाविद्यालयांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून कोणतेही अनुदान मिळणार नाही. नवीन विषय व वर्ग तुकड्या सुरू करण्यासही मान्यता मिळणार नाही. विद्यापीठाच्या कोणत्याची निवडणुकांमध्ये सहभागी होता येणार नाही, असा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अनेकदा महाविद्यालयांना दिलेला आहे. बऱ्याचदा लेखी स्मरणपत्रेही महाविद्यालयांना पाठविण्यात आलेली आहेत. मात्र, तरीही महाविद्यालयांकडून “नॅक’ मूल्यांकनासाठी पुरेसा पुढाकार घेतल्याचे चित्र पहायला मिळत नाही. आता या महाविद्यालयांना “कारणे दाखवा’ नोटिसा बजाविण्यात येणार आहेत, अशी माहिती विद्यापीठातील सूत्रांकडून मिळाली आहे.

एकदाही “नॅक’ मूल्यांकन न झालेल्या अनुदानित महाविद्यालयांच्या यादीत पुणे शहरातील येरवडा परिसरातील एका महाविद्यालयाचा समोवश आहे. या महाविद्यालयाला अनेकदा सूचना दिलेल्या आहेत. तरीही या महाविद्यालयाने त्याकडे पाठ फिरवली आहे. “नॅक’ मूल्यांकन न करणाऱ्या सर्वच अनुदानित महाविद्यालयांचे अनुदानही थांबविण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा विद्यापीठ व उच्च शिक्षण संचालक कार्यालयांनी दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)