26/11 च्या पाकमधील खटल्यातील मुख्य सरकारी वकिलास हटवले

सरकारी भूमिकेला न अनुसरल्याचा ठपका 

लाहोर – मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानात सुरू असलेल्या खटल्यातील मुख्य सरकारी वकिलांना पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने तडकाफडकी या प्रकरणातून हटवले आहे. या प्रकरणी सरकारच्या भूमिकेला न अनुसरल्याने त्यांना खटल्याच्या कामकाजातून हटवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 26/11 च्या आरोपींना शिक्षा होण्यासाठी भारताकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांना त्यामुळे मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तानच्या प्रांतिय तपास संस्थेचे विशेष वकिल चौधरी अझहर यांना 26/11 च्या खटल्यासाठी 2009 पासून मुख्य सरकारी वकिल म्हणून नियुक्‍त करण्यात आले होते. मात्र आता या खटल्यासंदर्भात त्यांची काहीही आवश्‍यकता नसल्याचे गृह मंत्रालयाकडून चौधरी यांना कळवण्यात आले आहे. ज्या पद्धतीने हा खटला चालवला जात आहे, त्यावरून चौधरी आणि पाकिस्तान सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले होते. हा खटला पुस्तकी तरतूदींच्या आधारे चालवला जावा, याकडे चौधरी यांचा कल होता, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपल्याला या खटल्यातून हटवले गेले असल्याची पुष्टी स्वतः चौधरी यांनीही केली आहे. मात्र या संदर्भात सरकारकडून कोणतेही कारण दिले गेलेले नाही. चौधरी यांना जरी या खटल्यापासून वेगळे केले गेले असले तरी बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणासारख्या अन्य काही खटल्यांमध्ये ते सरकारी वकिल म्हणून कायम असतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)