पोलिसांच्या कारवाईची आता ऑनलाईन नोंद
नगर: वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांना आता पुस्तकी पावतीऐवजी ई-चलन पावती देण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. शहर वाहतूक विभागासाठी पोलिसांना 25 ई-चलन मशिन देण्यात आल्या आहेत. नगरकरांनीही या उपक्रमाचे स्वगत केले आहे.
पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक पोलीस विभागाला जिल्हाभरात एकूण 50 ई- चलन मशिन देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ई-चलन मशिन नगर शहरासाठी 25 मशिन, तर त्या पाठोपाठ शिर्डी, श्रीरामपूर, संगमनेर, शेवगाव या तालुक्यांत उर्वरित मशिन देण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यानंतर या मशिनच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांना ऑफ लाईन पावत्या पोलीस विभागाच्यावतीने देण्यात येत होत्या. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे तक्रारी होत होत्या. आता ई-चलन आल्यामुळे पोलीस खात्यातील भ्रष्टाचार कमी होईल. असेही नागरिकांमधून बोलले जात आहे.
शहर वाहतूक विभागाने आता पर्यंत शहरातील 30 विविध ठिकाणी ई-चलनाद्वारे कारवाई केली आहे. वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांकडून खिशात पैसे नसले तरी एटीएम द्वारे देखील दंड वसूल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.