25 हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार “पास’ योजनेचा लाभ

file photo

एसटी महामंडळाचा निर्णय : निर्णायाच्या अंमलबजावणीचे आदेश जारी

पुणे – तब्बल 60 वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आता सुखाचे दिवस येऊ लागले आहेत. राज्य शासन आणि एसटी महामंडळाने चालक, वाहक आणि शिपायांना पदोन्नतीमध्ये 25 टक्‍के आरक्षण देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. या घटनेला 24 तास उलटण्याच्या आधीच एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीसह राज्यभरात एसटी बसने कोठेही फिरण्यासाठी मोफत पास देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याबाबतचा अध्यादेश महामंडळाने काढला असून सद्यस्थितीत तब्बल 25 हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमा या पास योजनेचा लाभ होणार आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.

एसटी महामंडळाचे राज्यभरात 1 लाख 5 हजार कर्मचारी आहेत. त्यामध्ये वाहक आणि चालकांची संख्या सर्वाधिक म्हणजे 70 हजारांच्या आसपास आहे. महामंडळाच्या उभारणीत आणि महामंडळाचा महसूल वाढविण्यात या सर्वच कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. विशेष म्हणजे त्यांच्या योगदानामुळेच गेल्या काही वर्षांच्या कालावधीत महामंडळाच्या प्रवासी संख्येत भरीव वाढ झाली आहे. मात्र, त्यांच्या या योगदानाची महामंडळाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. सेवेत असताना या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नीला प्रवासी भाड्याचा पास दिला जातो. हे वास्तव असले तरी, सेवेत असताना सुट्ट्या मिळत नसल्याने आणि कामाच्या व्यापामुळे त्यांना या सवलतीचा लाभ घेता येत नाही; सेवानिवृत्त झाल्यानंतर आपोआप ही सवलत रद्द करण्यात येत होती.

त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर या योजनेचा लाभ घेता यावा आणि कुटुबांसह देवदर्शन अथवा अन्य ठिकाणी जाता यावे. यासाठी हे पास सेवानिवृत्तीनंतरही कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी कामगार संघटनांच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत होती. मात्र, या मागणीचा पाठपुरावा करूनही महामंडळ आणि राज्य शासनाच्या वतीने या मागणीची दखल घेण्यात आलेली नव्हती. राज्यात भाजपा शिवसेनेचे सरकार आल्यानंतर कामगार संघटनांच्या वतीने परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार या मागणीची दखल घेत महामंडळाच्या वतीने या महत्वपूर्ण योजनेला मान्यता देण्यात आली. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी करण्यात आले असून सद्यस्थितीत त्याचा लाभ तब्बल 25 हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे.

राज्यात कोठेही फिरा बिनधास्त
खासगी बसेसच्या वेगामुळे एसटीची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. या पडत्या काळात वाहक आणि चालकांनी एसटीचे चाक रूळावर आणण्यासाठी परिश्रम घेतले. त्यांच्या या योगदानामुळेच एसटीची आर्थिक परिस्थिती काही प्रमाणात चांगली आहे. मात्र, हे वास्तव असतानाही महामंडळ अथवा राज्य शासनाच्या वतीने या कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सवलती दिल्या जात नव्हत्या. आता या योजनेमुळे त्यांना राज्यभरात कोठेही बिनधास्त फिरता येणार आहे. महामंडळाच्या निर्णयानुसार त्यांनी आवश्‍यक ती कागदपत्रे सादर केल्यास सेवानिवृत्त कामगारांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

सेवेत असताना महामंडळाच्या वतीने या कर्मचाऱ्यांना फिरण्यासाठी पास दिला जात आहे. परंतु, कामाच्या आणि कौटुबिंक व्यापामुळे सेवेत असताना आणि इच्छा असतानाही त्यांना फिरणे शक्‍य होत नाही. ही बाब लक्षात घेऊनच त्यांच्यासाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याचा लाभ हजारो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे.
– रणजितसिंह देओल, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)