राज्यात तब्बल 245 वाघ

20 टक्‍क्‍यांनी वाढ ः बछड्यांचीही संख्या लक्षणीय
मुंबई – वाहनांच्या धडकेने किंवा शिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या हत्येमुळे वाघांच्या घटत्या संख्येमुळे वन्यप्राणीप्रेमींमध्ये नाराजी होत असतानाच दुसरीकडे वाघांपेक्षा त्यांच्या बछड्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. 2018 च्या व्याघ्रगणनेनुसार राज्यात वाघांच्या संख्येत 20 टक्के वाढ होऊन आता 245 वाघ असल्याची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे वाघांचे दोन वर्षांपर्यंतचे 250 बछडे असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

महाराष्ट्रात ताडोबा, पेंच, सह्याद्री, नवेगाव-नागझीरा, मेळघाट, बोर आदी ठिकाणच्या जंगलात वाघांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. परंतु, वाघांच्या मृत्यूमुळे तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत होती. गेल्या पाच वर्षांत वाघांच्या संरक्षण तसेच संवर्धनासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी 2018च्या व्याघ्रगणनेनुसार राज्यात 250 वाघ आहेत. 2014 साली हीच संख्या 204 इतकी होती. यामध्ये 20 टक्के वाढ होऊन महाराष्ट्रात आता 245 वाघ असल्याची नोंद झाली आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

व्याघ्रगणनेनुसार 4 वर्षे पूर्ण झालेल्या वाघांचीच गणना केली जाते. पण राज्यात दोन वर्षांखालील वाघाच्या बछड्यांची संख्या 250 इतकी आहे. वाघाच्या जन्माला आलेल्या बछड्यांची “लाईफ एक्‍स्पेक्‍टन्सी’ 50 टक्‍के असते. म्हणजेच एकूण जन्माला आलेल्या बछड्यांपैकी पन्नास टक्‍के बछडे पूर्ण आयुष्य जगतात. त्यामुळे बछड्यांची वाढलेली संख्या देखील आनंदाची बातमी असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान, राज्यात व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी गांभीर्याने पाऊले उचलण्यात येत असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)