24 फेब्रुवारीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत वाढतंय विघ्न

सैनिकी स्कूलची प्रवेश परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा एकाच दिवशी
परीक्षेच्या वेळा बदलण्याची शक्‍यता अधिक

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या 24 फेब्रुवारीला शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार असून याच दिवशी अखिल भारतीय सैनिकी स्कूलची प्रवेश परीक्षाही होणार आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा एकाच दिवशी व एकाच वेळी आल्याने मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत विघ्नच वाढू लागले आहेत. अखेर आता शिष्यवृत्ती परीक्षेची वेळ बदलण्याचीच शक्‍यता अधिक असून त्याबाबतच्या हालचाली परीक्षा परिषदेकडून सुरू करण्यात आल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परीक्षा परिषदेच्या वतीने आधी 17 फेब्रुवारीला इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, याच दिवशी राज्य लोकसेवा आयोगाचीही परीक्षा येत असल्याने आयोगाकडून शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याबाबत लेखी पत्राद्वारे परीक्षा परिषदेकडे मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेत परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलून 24 फेब्रुवारी ही तारीख निश्‍चित करण्यात आली. मात्र, आता या दिवशीही परीक्षेसाठी अडचण निर्माण झाली आहे.

अखिल भारतीय सैनिक स्कूलच्या वतीने इयत्ता सहावीसाठी प्रवेश परीक्षा आधी 6 जानेवारीला आयोजित करण्यात आली होती. मात्र, या दिवशीचा पेपर 1 हा प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आला होता. आता हा रद्द झालेला पेपर 24 फेब्रुवारीला सकाळी 10 ते 12.30 या वेळेत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये केंद्रे असतील व एकूण 3 हजार 515 विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.

या परीक्षेसाठी इयत्ता पाचवीत शिक्षक असलेले विद्यार्थीच बसणार आहेत. त्यामुळे सातारा येथील सैनिकी स्कूलच्या प्राचार्यांनी परीक्षा परिषदेकडे शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख किंवा वेळ बदल्याची मागणी लेखी पत्राद्वारे नुकतीच केली आहे. या पत्राची परीक्षा परिषदेकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली असून पुढील कार्यवाहीसाठी हालचाली जोरात सुरू केल्या आहेत.

महाराष्ट्रात एकाच दिवशी व एकाच वेळी शिष्यवृत्ती परीक्षा घ्यावी लागणार आहे. इयत्ता पाचवीसाठी 5 लाख 12 हजार 477 व इयत्ता आठवीसाठी 3 लाख 52 हजार 968 असे एकूण 8 लाख 65 हजार 445 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज दाखल केले आहेत. राज्यातील एकूण 5 हजार 857 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. आतापर्यंत परीक्षेची वेळ ही पेपर 1साठी सकाळी 11 ते दुपारी 12.30 व पेपर 2साठी दुपारी 1.30 ते 3 अशी निश्‍चित केली होती.

विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांना बसता यावे यासाठी आता मात्र पहिल्यांच ही वेळ बदलावी लागणार आहे. पेपर 1 साठी दुपारी 1 ते 2.30 तर पेपर 2 साठी दुपारी 3.30 ते 5 या सुधारित वेळेनुसार परीक्षा घेण्याबाबत परीक्षा परिषदेची चर्चा चालू आहे. परीक्षेची तारीख बदलण्याऐवजी वेळ बदलण्यालाच प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही समजले आहे. परीक्षेसाठी वेळ निश्‍चित झाल्यानंतर त्याबाबतची सुधारित अधिसूचनाही परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)