24 तासांमध्ये मिळणार वीजग्राहकांना संपूर्ण माहिती

महावितरणाकडून ग्राहकांना दिलासा : मोबाइल क्रमांक व ई-मेल नोंदविण्याचे आवाहन

पुणे – वीजमीटरचे रिडिंग घेतल्यानंतर वीजबीलाची छपाई करून ते मिळण्यासाठी लागणारा उशीर, मुदत संपून गेल्यानंतर भरावा लागणारा दंड आणि एवढे करूनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून खंडित होणारा वीजपुरवठा या सर्व बाबींमुळे राज्यभरातील लाखो वीज ग्राहक अक्षरश: त्रस्त झाले आहेत. मात्र, आता या सर्व प्रकारांना आळा बसणार असून लाखो ग्राहकांना दिलासा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे. सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या वीजमीटरचे रिडिंग घेतल्यानंतर त्यांना अवघ्या 24 तासांच्या आत त्यांच्या मोबाइलवर त्यांच्या वीजबीलाची माहिती मिळणार आहे. या महिन्यापासूनच या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला आहे.

-Ads-

तत्कालीन विद्युत मंडळाचे चार कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर थेट ग्राहकांशी संबधित असलेल्या महावितरण प्रशासनाने सर्वच बाबतीत काळानुरूप बदल करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार ग्राहकांना सर्व सेवा कशा हायटेक देता येतील, याला प्रशासनाच्या वतीने प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातूनच महसूल वसूलीचे उद्दिष्टही साध्य करण्यात आले आहे. यापूर्वी ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांना दर तीन महिन्याला वीजबीले देण्यात येत होती. त्यामुळे प्रशासनाचा महसूल अडकून राहात होता. त्याशिवाय तब्बल तीन महिन्यानंतर वीजबीले येत असल्याने ग्राहकांवर आर्थिक ताण येत होता. त्यामुळे दरमहा वीजबील देण्याचा प्रयोग सर्वप्रथम शहरी भागात राबविण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो ग्रामीण भागातही राबविण्यात आला. त्यामुळे प्रशासनाच्या महसूलात भरीव वाढ झाली आहे. मात्र, वीजमीटरचे रिडिंग घेतल्यानंतर छपाईसाठी लागणारा वेळ आणि त्यानंतर प्रत्यक्षात ग्राहकांच्या हातात पडणारे वीजबील या प्रक्रियेसाठी कमालीचा वेळ लागत होता. त्यामुळे ग्राहकांना वीजबील मिळाल्यानंतर त्याचा भरणा करण्यासाठी धावपळ करावी लागत होती. याबाबत राज्यभरातील ग्राहकांनी प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याशिवाय या प्रक्रियेमुळे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये अनेकवेळा वादाचेही प्रकार घडले होते. त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून यापुढील कालावधीत राज्यभरातील सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या वीजमीटरचे रिडिंग घेतल्यानंतर त्यांना अवघ्या 24 तासांच्या आत त्यांच्या मोबाइलवर वीजबीलाची रक्‍कम किती आहे आणि त्याची भरण्याची मुदत किती आहे, याची पूर्ण माहिती मिळणार आहे, अशी माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी दिली.

देशात अशा प्रकारचा प्रयोग करणारी महावितरण ही पहिलीच कंपनी आहे, असे स्पष्ट करून पाटील म्हणाले की, या महिन्यापासूनच त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वीच ग्राहकांना त्यांच्या मोबाइलचे नंबर आणि ई-मेल आयडी नोंदविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आतापर्यंत 50 ते 60 टक्‍के वीज ग्राहकांनी याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर, उर्वरित ग्राहकांना याबाबत आवाहन करण्यात आले आहे. तरी ग्राहकांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही पाटील यांनी केले.

वीजबीलही मिळणार 4 दिवसांत
वीजमीटरचे रिडिंग घेणे, त्यानंतर या बिलांची छपाई करणे आणि या बिलांचे ग्राहकांना वाटप करणे, ही प्रक्रिया खूपच किचकट आहे. त्याचा त्रास ग्राहकांना आणि महावितरण प्रशासनालाही सहन करावा लागत होता. मात्र, ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या ग्राहकांना वीजमीटरचे रिडिंग घेतल्यानंतर 4 दिवसांच्या आत बिलाची ही प्रत मिळणार आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)