पाकिस्तानच्या दुतावासातून 23 भारतीय पासपोर्ट गायब

परराष्ट्र मंत्रालयाकडून गंभीर दखल : सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या दुतावासातून 23 भारतीय पासपोर्ट गायब झाल्याने भारतातील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. हे सर्व पासपोर्ट शीख भाविकांचे असून ते गेल्या महिन्यात यात्रेनिमित्त पाकमध्ये गेले होते. हरविलेले सर्व पासपोर्ट रद्द करण्याची परराष्ट्र मंत्रालयाने तयारी सुरु केली असून हे प्रकरण पाकिस्तानच्या उच्चायुक्तांसमोरही मांडले जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानकडून 21 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत 3,800 शीख भाविकांना व्हिसा मंजूर करण्यात आला होता. हे व्हिसा गुरुनानक यांच्या 549 व्या जयंतीनिमित्त जारी करण्यात आले होते. यापैकी 23 जणांनी पासपोर्ट हरवल्याची तक्रार नोंदविली आहे. मात्र, या मागे पाकिस्तान अधिकाऱ्यांचा हात नसल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.

शीख भाविकांकडून एका एजंटने हे पासपोर्ट घेतले होते. हा एजंट दिल्लीतील असून व्हिसासाठी पाकिस्तानी उच्चायुक्तांकडे कागदपत्र सादर करण्यासाठी त्याने पासपोर्ट हवे असल्याचे सांगितले होते. एजंटने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने पासपोर्ट आणि अन्य कागदपत्रे पाकिस्तानच्या दुतावासात जमा केली होती. तो पासपोर्ट घेण्यासाठी तिथे गेला असता दुतावासातील कर्मचाऱ्यांनी कागदपत्रेच मिळालेली नाही, असे सांगितल्याचा दावा त्याने केला.

या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती दिली. हा गंभीर प्रकार असून पासपोर्टचा गैरवापर होऊ नये याची आम्ही दक्षत घेवू, असे परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)