चाकण हिंसाचारप्रकरणी 23 जणांना न्यायालयीन कोठडी 

न्यायाधीश तांबोळी यांनी सुनावली शिक्षा : पोलिसांवर दगडफेक, सरकारी, खासगी वाहनांचे मोठे नुकसान 

राजगुरूनगर: चाकण (ता. खेड) येथे दि. 30 जुलै रोजी मराठा मोर्चा दरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या 23 जणांना आज (बुधवारी) खेड न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

चाकण पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तीन अलपवयीन मुलांसह 30 जणांना अटक केली होती, त्यापैकी 23 जणांना पुणे आणि राजगुरूनगर न्यायालयाने पोलीस कोठडी दिली होती. या 23 जणांना आज खेड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जे. तांबोळी यांच्या कोर्टापुढे पोलिसांनी हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

चाकण व राजगुरूनगर येथे सकल मराठा समाज क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाला 30 जुलै रोजी हिंसक वळण लागले होते. या आंदोलनात पोलिसांवर दगडफेक करीत खासगी व सरकारी बसेससह अन्य वाहनांना आग लावून सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान करण्यात आले होते. यात सुमारे 7 ते 8 कोटी रुपयांचे यात नुकसान झाले होते. त्यामुळे चाकण पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केला आहे.

दरम्यान, आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या 30 जणांपैकी 3 अल्पवयीन असून 4 जणांना आधीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तर आज 23 जणांची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)