2160 विद्यार्थ्यांचा शाडूच्या गणेश मूर्ती बनविण्याचा विक्रम

 

पुणे  – “गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, अथर्वशीर्षाचे पठन आणि ढोल-ताशांच्या गजरात’ डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेतील 2 हजार 160 विद्यार्थ्यांनी आज शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याचा विक्रम प्रस्थापित केला.
आर्टस ऍण्ड क्रिएटिव्हिटी या विभागाअंतर्गत वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने या विक्रमाची नोंद करून मान्यता दिली आहे. संस्थेचे प्रमुख पवन सोलंकी यांनी प्रमाणपत्र शाळेला प्रदान केले. सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष विकास काकतकर, शाला समितीचे अध्यक्ष दिलीप कोटिभास्कर, मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी, डॉ. एस. एन. कानिटकर, डॉ. सविता केळकर, शिल्पकार अभिजीत धोंडाळे यावेळी उपस्थित होते.
या विक्रमासाठी गेल्या आठ दिवसांपासून प्रशालेत तयारी सुरू होती. कला शिक्षक जयंत टोले आणि संदीप माळी यांच्या मार्गदर्शनाखाली 2500 किलो शाडू माती मळून त्याचे गोळे करण्याचे काम पूर्ण केले. शिल्पकार अभिजीत धोंडाफळे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले.
आज सकाळी उत्साहवर्धक वातावरणात गणेश मूर्ती बनविण्याचे काम सुरू केले. प्रत्येक वर्गात 60 याप्रमाणे 2160 मूर्ती तयार करण्यात आल्या. पुढील शनिवारी या मुर्ती विद्यार्थी घरून रंगवून आणणार आहेत. त्यातील सर्वोत्कृष्ट मुर्तीची शाळेत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
मुख्याध्यापिका तिलोतमा रेड्डी यांनी प्रास्ताविक, सुहास देशपांडे यांनी सूत्रसंचालन, दीपाली चौगुले यांनी परिचय आणि उपमुख्याध्यापिका स्नेहल कुलकर्णी यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)