महापालिकेकडून विसर्जन घाटांची स्वच्छता : मांडव व्यवस्था, स्वच्छता तसेच रंगरंगोटी

पुणे – वैभवशाली गणेशोत्सवाची तयारी महापालिकेकडून पूर्ण करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख नदीपात्रातील विसर्जन घाटांची स्वच्छता करण्यात आली असून सुमारे 210 ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात विसर्जन घाटांवर मांडव व्यवस्था, स्वच्छता तसेच रंगरंगोटी करण्यात आली आहे.

शहरात दरवर्षी सहा लाख गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. शहरात दिड दिवस, तीन, पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणेश मुर्तीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच गणेश मुर्ती विसर्जन सुरू होते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून नदीकाठच्या परिसरात बांधण्यात आलेले 46 हौद वर्षभर राडारोडा भरून ठेवलेले असतात, त्यातील राडारोडा काढून या हौदांची स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्या रंगरंगोटीचे कामही पूर्ण करण्यात आले असून नदीकाठच्या हौदांच्या परिसरात वाढलेली झुडपेही काढण्यात आली आहे. या शिवाय, महापालिकेकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर मुर्ती विसर्जनासाठी लोखंडी टाक्‍यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

निर्माल्य कलशही तयार
महापालिकेकडून या उत्सवाच्या कालावधीत विसर्जन घाट तसेच हौदांच्या परिसरात निर्माल्य संकलनासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नदीपात्रातील घाटांवर आवश्‍यक असलेले निर्माल्य कलश तसेच कंटेनर ठेवण्यात आलेले आहेत. या शिवाय, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला महापालिकेकडून प्रत्येकी 3 या प्रमाणे ज्या ठिकाणी विसर्जनासाठी टाक्‍या ठेवण्यात येणार आहेत त्या ठिकाणी 41 निर्माल्य कलश ठेवले जाणार असून जमा होणाऱ्या या निर्माल्यापासून खत करून ते महापालिकेच्या उद्यानासाठी वापरण्यात येणार आहे. दहा दिवसांत संकलीत होणाऱ्या या निर्माल्य कलशाच्या वाहतुकीसाठीही प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

210 ठिकाणी विसर्जनाची सुविधा
मागील वर्षी प्रमाणेच यंदाही प्रशासनाकडून शहरात 210 ठिकाणी गणेशमुर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात 22 नदीपात्रातील घाट, 23 नदीपात्र, 46 नदीपात्रातील हौद, 82 ठिकाणी लोखंडी टाक्‍या, वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारा 1 तलाव, 7 विहीरी, तसेच 28 कॅनॉलची ठिकाणे यांच्यासह येवलेवाडी येथील एका खानीचा समावेश असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)