फर्निचर खरेदीमध्ये गोलमाल
चुकीच्या पद्धतीने विषय आणण्याची नवी पद्धत
एखादा ठेकेदार पूर्वी काम करत असेल तर त्यालाच नवे काम कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता देण्याचा नवा पायंडा महापालिकेत सुरू झाला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत भिंती रंगविणे, चित्रे काढणे या साठी 25 लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने आज मान्यता दिली. हा विषय कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता दामटण्यात आला आहे.“तर’ तो पालिका प्रशासनाचा दोष
कचऱ्याच्या समस्येवरून सभेत झालेल्या चर्चेबाबत स्थायीचे अध्यक्ष मडिगेरी यांना विचारले असता हा सर्व प्रशासनाचा दोष असल्याचे सांगत त्यांनी “कचऱ्या’वरून हात झटकले. सत्ताधाऱ्यांनी करार पाहिले नाहीत का? या प्रश्नावरही त्यांनी उत्तर न देता शहरातील कचऱ्याच्या समस्येवर पालिकेतील सत्ताधारी किती गंभीर आहेत, याचाच प्रत्यय आणून दिला.
पिंपरी – महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या बेधुंद कारभाराचा नमुना आज स्थायी समितीने सादर करत आयत्या वेळच्या तब्बल 15 विषयांना मंजूरी देत या कामांवर 21 कोटी 74 लाखांची उधळपट्टी करण्यासही मान्यता दिली. तर ड्रेनेज सफाईच्या मशीन खरेदी या वादग्रस्त विषयालाही मंजुरी देत करोडो रुपयांच्या उधळपट्टीस मोकळीक दिली आहे.
महापालिकेत तब्बल 15 वर्षे एकसत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करत सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षानेही राष्ट्रवादीचीच “री’ ओढत आपला कारभार चालविल्याचे स्पष्ट होत आहे. 3 आणि 10 जुलै रोजीच्या स्थायी समितीच्या दोन तहकूब सभा शुक्रवारी पार पडल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायीचे सभापती विलास मडिगेरी होते. स्थायी समितीसमोर दोन्ही सभेचे मिळून 84 विषय होते. 12 विषयांना तहकूब करत उर्वरित सर्व विषय मंजूर करण्यात आले.
अजेंड्यावरील 63 कोटींहून अधिक रकमेचे विषय मंजूर करतानाच आयत्यावेळच्या तब्बल 21 कोटी 74 लाख रुपयांचे विषय मंजूर करण्यात आले. आयत्या वेळच्या विषयांमध्ये रस्ते अत्याधुनिक पद्धतीने बनविणे, मनपाच्या प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे, बहिणाबाई चौधरी उद्यानाचे सुशोभीकरण या तात्काळ निकड नसणाऱ्या विषयांना मंजुरी देण्यात आली. शहराची गरज नसताना तसेच आपत्कालीन विभाग व अग्निशामक विभागाने नकारात्मक अभिप्राय दिल्यानंतरही “देवदूत’वर यापुर्वी करोडो रुपये खर्च केले होते. आता त्याच ठेकेदाराला ड्रेनेज सफाईच्या मशीन खरेदी व त्यापोटी येणाऱ्या दैनंदिन खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागासाठी फर्निचर खरेदी करण्यात येणार असून त्यापोटी येणाऱ्या 62 लाख 45 हजारांच्या खर्चास स्थायीने आज मान्यता दिली. या विषयाला राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोध दर्शविला.
दोन ठेकेदारांना हे काम देण्यात आले असून यामध्ये “रिंग’ झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक पंकज भालेकर व अन्य सदस्यांनी केला. तर भाजपाच्या नम्रता लोंढे यांनीही या विषयाला विरोध नोंदविला. राष्ट्रवादीचे नगरसेवक “रिंग’बाबतीत चांगलेच आक्रमक झाले होते, परंतु संख्याबळाच्या आधारे मडिगेरी यांनी या विषयाला मान्यता दिली.