2022 पर्यंत अंतराळात तिरंगा फडकणार – नरेंद्र मोदी

अंतराळ संशोधनात भारतीय वैज्ञानिकांनी केलेल्या कामगिरीचा गौरव
नवी दिल्ली – देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे 2022 मध्ये भारत अंतराळात मोठी भरारी घेईल. 2022 मध्ये भारतीय बनावटीच्या यानातून पहिला भारतीय अंतराळाची सफर करू शकेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात सांगितले.

भारतीय वैज्ञानिकांनी अंतळात संशोधनात केलेल्या कामगिरीचा गौरव मोदी यांनी आपल्या भाषणात केला. मोदी म्हणाले, भारतीय वैज्ञानिकांनी एकाच वेळी 100 उपग्रह अवकाशात सोडले. मी देशातील नागरिकांना आनंदाची बातमी देतो की, अंतराळ क्षेत्रात भारत वेगात प्रगती करत आहे. 2022 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनापूर्वी भारतीय बनावटीच्या यानातून पहिला भारतीय अंतराळाची सफर करू शकेल.

देशातील एक मुलगा किंवा मुलगी अंतराळात जाईल आणि तिथे आपला तिरंगा दिमाखात फडकवेल. अंतराळात जाण्याचे स्वप्न 2022पर्यंत पूर्ण करण्यावर मोदींनी यावेळी भर दिला. मोदी म्हणाले की, मंगळ यानाच्या यशस्वी प्रेक्षपणानंतर भारतीय वैज्ञानिकांना देशाची ताकद जगाला दाखवून दिली आहे. भारतीय उपग्रह मनुष्याला अंतराळात घेऊन नक्की जाईल. त्यावेळी अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश ठरेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला जो शब्द दिलाय तो पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 2022 पर्यंत भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्यासाठी अवकाश संस्था पूर्णपणे सक्षम आहे असे इस्त्रोचे अध्यक्ष आणि वैज्ञानिक के. शिवन यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला 2022 पर्यंतचे लक्ष्य दिले आहे. ठरवून दिलेल्या वेळेत लक्ष्य पूर्ण करणे आमचे कर्तव्य आहे.

भाषणातील ठळक मुद्दे
– प्रामाणिक करदात्यांचा देशाच्या विकासात मोठा वाटा मिळेल. या करदात्यांमुळेच देशासाठी, गरिबांसाठी अनेक योजना राबवणे शक्‍य होते. आज देशात पावणे सात कोटी नागरिक कर भरतात. 2013 पर्यंत हा आकडा 4 कोटी होता. परंतु या 4 वर्षात हा आकडा दुपटीने वाढला आहे.

– कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांचे हित जपणारे हे सरकार आहे. 75 व्या स्वातंत्र्यदिनापूर्वी शेतकऱ्यांना दुपटीने भाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

– येत्या 25 सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीला पंतप्रधान जनआरोग्य योजना सुरु करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत 10 कोटी कुटुंबांना (50 कोटी लोक) 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना गंभीर आजारांवर उपचारांची चिंता जाणवणार नाही.

– सरकारी अनुदान, सरकारी योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या सहा कोटी बोगस लोकांचे नावे आम्ही कमी केले आहेत. यामधून देशाच्या तिजोरीतले तब्बल 90 हजार कोटी रुपये वाचले.

– स्वातंत्र्यानंतरचे देशातले हे पहिलं मंत्रिमंडळ आहे, ज्यात महिलांना सर्वाधिक स्थान आहे. देशात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात तीन महिला न्यायमूर्ती.

– एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार देशातील पाच कोटी जनता गेल्या दोन वर्षांत गरिबीरेषेतून वर आले आहेत.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान आमच्यासाठी मार्गदर्शक आहे. गरिबांना न्याय मिळावा, दलित, आदिवासींना विकासाचा अधिकार संविधानाने दिला आहे.

– जगभरातील अर्थतज्ज्ञांकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक होत आहे. छोटी गावे, शहरांमध्ये स्टार्टअपला सुरुवात झाली आहे.

– आमच्या सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, वन रॅंक वन पेन्शन, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)