2019ला आमचीच सत्ता – अमित शहा

संग्रहित छायाचित्र

‘युती झाली नाही तर शिवसेनेलाही धोबीपछाड’

लातूर – आगामी काही दिवसात लोकसभेची निवडणूक होणार आहे. 2019 या वर्षात होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागुन आहे. या निवडणुकीत भाजपाच विजयी होणार आहे. त्यासाठी तयारीला लागा. आगामी निवडणूक ही पानिपतची लढाई आहे. पानिपतच्या लढाईत पराभुत झाल्यानंतर देश 200 वर्ष गुलामीत राहिला. आता ही निवडणूक जिंकली तर पुढील 50 वर्ष आपल्या विचाराची सत्ता राहील. यासाठी कामाला लागा, अशा सूचना देत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमित शहा यांच्या उपस्थितीत लातुरसह उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातील बुथ प्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुखांचा मेळावा थोरमोटे लॉंस येथे संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे,संभाजीराव पाटील-निलंगेकर, खासदार सुनिल गायकवाड, सुरजीतसिंह ठाकूर, विजय पुराणिक उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले, भाजपा हा शांतपणाने आपले काम करणारा पक्ष आहे. विजयाने आम्हाला अहंकार येत नाही, तर पराभवाने आम्ही घाबरत नाही. 10 सदस्यांनी स्थापन झालेल्या भाजपाचे आज 11 कोटी सदस्य आहेत. 16 राज्यात भाजपाची सरकारे आहेत. देशातील 91 टक्के शक्ती केंद्रात भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आपला विजय नक्की आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात आज युती आहे. भविष्यात युती झाली तर सहकाऱ्याला विजयी करू पण युती झाली नाही तर त्याच सहकाऱ्याला पराभुत करू असे सांगत शहा यांनी युतीबाबत आपली भुमिका स्पष्ट करतानाच स्वबळावर लढण्याची तयारी करण्याच्या सुचना केल्या. महागठबंधन होणार अशी हवा केली जात आहे. पण या आघाडीत असणारे पक्ष त्या-त्या राज्यात मर्यादित आहेत. देशपातळीवर त्यांना कोणी विचारत नाही.मागच्या वेळी आम्ही उत्तर प्रदेशात 73 जागा जिंकल्या होत्या. यावेळी सपा व बसपा एकत्र लढले तरी 74 जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

युतीची चिंता करू नका
2019चा विजय हा 2014 पेक्षाही मोठा असेल. तुम्ही युतीची चिंता करू नका. आपल्याला स्वतःच्या ताकदीवर जिंकायचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मागच्या वेळी 122 जागा जिंकल्या होत्या. दिड कोटी मते घेतली होती. स्वबळासाठी 2 कोटी मतांची आवश्‍यकता आहे. आपले लाभार्थी त्यापेक्षा जास्त आहेत, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)