जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी 200 कोटी

मुंबई – राज्यातील जिल्हा परिषदेच्या दुरावस्था झालेल्या शाळांमधील वर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी सुमारे 200 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीचे आमदार सत्यजीत पाटील यांनी पन्हाळा तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या 194 शाळांपैकी 166 शाळांची दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता.

ज्या शाळांच्या इमारती धोकादायक आहेत व वापरण्यास अयोग्य आहेत अशा इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी न बसवता त्यांची इतर ठिकाणी व्यवस्था केल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.2018-19 मध्ये जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी 64 लाखांचा निधी मंजूर असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदांच्या शाळांच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. वर्गखोल्यांच्या सध्यस्थितीनुसार ए, बी आणि सी अशी वर्गवारी करण्यात येणार आहे.

धोकादायक वर्गखोल्यांचा समावेश “सी’ वर्गवारीत असणार आहे. या वर्गवारीतील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देऊन त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. सध्या बीड जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणी सुरु आहे. त्यासाठी दोनशे कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here