-बारामती तालुका पोलिसांचा रोडरोमिओंवर कारवाईचा बडगा
-शैक्षणिक संस्थांच्या परिसरात “कोटपा’ची अंमलबजावणी
-16 जणांसह 9 दुकानदारांवर कारवाई
-4200 रुपये दंड वसूल
बारामती – “हर फिक्र को धुए में उडाता चला गया’… असे म्हणत आणि केवळ फॅशन म्हणून बारामती तालुका पोलीस हद्दीतील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात सिगारेटचे झुरके ओढणाऱ्या रोडरोमिओंना 10 रुपयांची सिगारेट 200 रुपयांना पडल्याने या परिसरात सिगारेट “नको रे बाबा’ म्हणण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी 16 सिगारेट ओढणाऱ्यांसह तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या 9 दुकानदारांवर कारवाई करीत 4200 रुपये वसूल केले आहेत.
बारामतीतील शाळा-कॉलेजच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांसह सिगारेटची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळून येत आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून कॉलेजच्या युवक-युवतींना सिगारेट, गुटखा खाण्याचे व्यसन जडले आहे. दरम्यान, सिगारेट, तंबाखू प्रतिबंध कायद्याच्या (कोटपा) कलम सहा अन्वये राज्यातील कोणत्याही शाळा कॉलेजच्या 100 मीटर परिसरात तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी आहे. तरीही तंबाखू, सिगारेटची विक्री सुरू आहे. त्यामुळे बारामती शहर पोलिसांकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेंतर्गत जे तंबाखूजन्य पदार्थांचे शाळा-कॉलेजच्या 100 मीटर परिसरात सेवन करीत होते त्यांच्यावर शुक्रवारी (दि. 12) व शनिवारी (दि. 13) कोप्टा अंतर्गत सर्वप्रथम खटले दाखल करून प्रत्येकी 200 रुपये दंड करण्यात आला आहे. मात्र, हा कायदा शाळा-कॉलेज परिसरात तंबाखूजन्य पदार्थ्यांची विक्री करण्यांवर दाखल करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येतो मात्र, बारामती तालुका पोलिसांनी “एक घाव दोन तुकडे’ या म्हणीप्रमाणे सर्वप्रथम तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे अपसूकच विद्यार्थी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही परिणामी विक्री पण होणार नसल्याने दुकानदार त्याची विक्री करणार नाही, त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचे परिसरात स्वागत होत आहे.
दरम्यान, नऊ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली त्यांनाही दंड ठोठवण्यात आला आहे. या नऊ दुकानदारांपैकी चार दुकानदार या महिला आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना व उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे पोलीस हवालदार पलंगे, महिला पोलीस हवालदार धुमाळ व त्यांच्या टीमने केली.
यांच्याकडून दंड वसूल
नारायण भीमराव बीबे, धनाजी बाबुराव आटोळे, विनोद विठ्ठल गोफणे, बापू वंदन बीबे (चौघे रा. सावळ), सागर धर्मा साबळे (रा. संदीप कॉर्नर), नवनाथ दत्तात्रय गवळी (रा. रुईपाटी), सुनील मल्हारी प्रजापती, मोहन निवृत्ती भंडलकर (दोघे रा. भिगवण रस्ता), बाळू जाधव (रा. एमआयडीसी), ज्ञानदेव मडके (भिगवनरस्ता), इरफान बागवान (रा. देसाई इस्टेट), बापू दादाराम पिसाळ (सीटीईन चौक), अजित तांबोळी (रा. सूर्यनगरी), मारुती वाघ (सूर्यनगरी), योगेश दगडू बुदावले (रा. जळोची), मुन्नाभाई शेख (रा. रूई). दुकानदार : किरण बबन वायदंडे, महादेव गुलाब मदने (दोघे रा.एमआयडीसी), लक्ष्मण तुकाराम खोमणे (रा. भिगवण रस्ता), रामभाऊ श्रीरंग जगतप (रा. मालुसरे वस्ती), राजेंद्र पांडुरंग खाडे (रा. वंजारवाडी).
बारामती तालुका पोलीस हद्दीतील शैक्षणिक संस्था परिसराच्या 100 मीटर अंतर्गत परिसरात धूम्रपान करणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायद्यांनुसार कारवाई यापुढेही करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणीही धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करून धूम्रपान मुक्त शहर-तालुका करण्याचा आमचा मानस आहे.
– धन्यकुमार गोडसे, निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे