20 हजार खांबाचा “पोल-झोल’!

माहितीही गायब : एकाच ठिकाणी दोन खांब

सुनील राऊत

पुणे – महापालिकेने गेल्या चार वर्षांत शहरात बसविलेले विद्युत खांब (पोल) पालिकेच्या “एन्टरप्रायजेस जीआयएस’ प्रणालीवरून गायब झाल्याचे समोर आले होते. मात्र, यातील जवळपास 20 हजार पोल पहिल्या सुस्थितील असलेल्या खांबांजवळ नव्याने लावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या ऑनलाइन यंत्रणेवर संबंधित ठिकाणी एकच पोल दिसत आहे. मात्र, पाहिले पोल असताना दुसरे पोल कशासाठी बसविले आणि त्यासाठी लाखो रुपयांच्या खर्चाला जबाबदार कोण, याचे उत्तर पालिकेकडे नाही.

महापालिकेच्या सुविधा गुगल मॅपवर दिसाव्यात, यासाठी “एन्टरप्रायजेस जीआयएस’ प्रणाली विकसित केली आहे. त्यावर पालिकेच्या खांबांसह, उद्याने, स्वच्छता गृहे तसेच इतर सुविधांची माहिती “जीआयएस मॅपिंग’द्वारे दर्शविण्यात आली आहे. त्यानुसार पालिकेने 2015 मध्ये शहरात 1 लाख 32 हजार खांब बसविले होते. तर 2018 मध्ये एकही आकड्याची वाढ झालेली नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत नव्याने बसविण्यात आलेले पोल गेले कोठे, असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. त्यानंतर विद्युत विभागाने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर घेतलेल्या झाडाझडतीमध्ये या पथदिव्यांचा शोध लागला आहे.

प्रत्येक प्रभागात 400 ते 500 दुबार पोल
प्रत्येक प्रभागात जवळपास 400 ते 500 ठिकाणी दुबार पोल लावल्याचे पथ विभागाने केलेल्या तपासणीत समोर आले आहे. विशेष म्हणजे, पहिला खांब सुस्थितीत असतानाच हे खांब उभे करण्यात आले आहेत. त्यावर अनेक ठिकाणी फिटिंग्ज नसून त्याची मागणी मुख्य खात्याकडे करण्यात आली आहे. तसेच या खांबांच्या नोंदीही ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे हे कोणी खरेदी केले, त्यासाठी किती पैसे दिले याचा काहीच ताळमेळ नाही. त्यामुळे संपूर्ण शहरात असे सुमारे 15 ते 20 हजार पोल असण्याची शक्‍यता विद्युत विभागाने व्यक्त केली आहे.

नवीन खांब 11 गावात बसविणार
दुबार खांबांची बाब समोर आल्यानंतर विद्युत विभागाने हे पोल काढण्याचे काम हाती घेतल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी दिली. हे खांब पालिकेकडून एका ठिकाणी घेण्यात येत असून नंतर हे सर्व पालिकेत नव्याने आलेल्या 11 गावांमध्ये बसविण्यात येणार असल्याचे कंदुल म्हणाले. त्यामुळे या गावासाठी नव्याने पोल खरेदी करण्याची गरज भासणार नाही, तसेच पालिकेचे पैसेही वाचणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)